मुंबई :- शरद पवारांच्या गेममुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात महाशिवआघाडी उदयास आली तर पहिली अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, त्यानंतरची अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो.
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करायच्या तयारीत आहेत. सत्तेच्या याच सारीपाटात राष्ट्रवादी काँग्रेस एक विक्रम रचू शकतं.
१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून राज्यात १५ वर्ष काँग्रेसच्या साथीनं राष्ट्रवादी सत्तेत आहे.
एकेकाळी काँग्रेसपेक्षा जास्त संख्याबळ असतानाही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद काँग्रेसला दिलं होतं. मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला मुख्यमंत्री होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी नक्की कुणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांच्या संख्येत फारसं अंतर नसल्याने राष्ट्रवादीलाही मुख्यमंत्रिपद हवं आहे.
राष्ट्रवादीतून अजित पवार हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे राज्याचा कारभार कुणाच्या हाती जातो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
शिवसेना-राष्ट्रवादीच्या जागांमध्ये अवघ्या एका जागेचा फरक असल्यामुळेच सत्तास्थापनेत राष्ट्रवादीही मुख्यमंत्रीपदावर समान कालावधीसाठी दावा करु शकते.