अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ”पाणी हेच हवामान आणि हवामान हेच पाणी आहे.प्रकृती आणि निर्सगाशी जोडून घेऊन पाण्याचे काम केले पाहिजे. केवळ जलसंधारण करून चालणार नाही तर जल संधारणाच्या कामानंतरचे नियोजन व व्यवस्थापन करणे गरजेचे”, असे प्रतिपादन जागतिक जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी केले.
नगर येथील जिल्हा नियोजन समिती भवनात जलसंपदा व जलसंधारण विभाग,जलसाक्षरता केंद्र यशदा व जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती अहमदनगरतर्फे आज झालेल्या विभागीय जलसाक्षरता कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ राजेंद्र सिंह बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, ”पाणी नसल्यामुळे माणसांचे विस्थापन होत आहे. हे होणारे विस्थापन आपण थांबवू शकतो. एकट्या महाराष्ट्रात देशातील एकूण पाणी साठ्यापैकी ४३ टक्के पाणी साठा आहे”. परंतु उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व व्यवस्थापन न झाल्याने जल संकट निर्माण झाले आहे. पाण्याबाबत नंबर एक आलेला महाराष्ट्र्र आत्महत्या करण्यात नंबर एक का झाला याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
जलसाक्षरता केंद्राचे संचालक आंनद पुसावळे, कार्यकारी संचालक डॉ सुमंत पांडे, जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे निमंत्रक तथा उपजिल्हाधिकारी रोहियो उदय किसवे, सदस्य सचिव तथा मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, जलनायक रमाकांतबापू कुलकर्णी, जलनायक किशोर धारिया, जलनायक विनोद बोधनकर, किशोर देशमुख आदी उपस्थित होते.