Maharashtra News : बाजारात कांदा महाग होतो तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत निषेध नोंदवत सभात्याग करतात. विरोधकांची ही भूमिका दुटप्पी आहे, अशा शब्दांत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू करावेत, याकरिता आपण त्यांच्याशी चर्चा करणार असून याबाबत केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात कांद्याचा प्रश्न पेटला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी डॉ. भारती पवार यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी डॉ. पवार म्हणाल्या की, मी संसदेत नेहमी राहुल गांधींना निषेध करताना बघितले. कांदा महागला की, ते निषेध करत सभात्याग करतात. टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले की, विरोधक महागाईच्या नावाने ओरडतात आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करतात.
शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळतो, तेव्हा किरकोळ बाजारात कांदा महाग होतो. अशावेळी राहुल गांधी सभागृहात निषेध का नोंदवतात? आम्ही तर शेतकऱ्यांची बाजू लावून धरली आहे, असे सांगत त्यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.
डॉ. पवार पुढे म्हणाल्या की, मागणी आणि पुरवठा याचा समतोल साधण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यातील एकूण परिस्थितीबाबत मंत्री पियूष गोयल यांच्याशी दोन-तीन दिवसांपासून चर्चा करत होते.
गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न जाणून घेतला. त्यानुसार आता नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.