वन्य प्राण्यांची दहशत; रात्री – अपरात्री एकटे फिरू नका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील सर्वच भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरु असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

यातच बिबट्याकडून मानवी वस्तीवर सुरु असलेले हल्ले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यात आता बिबट्या नंतर तरस या प्राण्याची दहशत सुरु झाली आहे.

नुकतीच नगर – औरंगाबाद रस्त्यावरील पोखर्डी परिसरात मंगळवारी सकाळी बिबट्या दिसल्याच्या अफवेने खळबळ उडाली.

ढवळे वस्तीवर मुरलीधर देठे यांना सकाळी शेतात वन्यप्राणी दिसला. त्यांना तो बिबट्या वाटला. त्यांनी तत्काळ ही बाब इतरांना सांगितली.

वनविभागालाही याबाबत माहिती मिळाल्यावर उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या मार्गदर्शनानुसार वन परिक्षेत्र अधिकारी व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांनी ठशांची पाहणी करून तो बिबट्या नसून ते तरस असल्याचे सांगितले. तसेच गणेश आगळे यांनीही ते पाहिले. ते तरस असल्याचे लक्षात आले.

त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच काही दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे वन विभागाने सांगितले. रात्री निर्जन भागात एकटे फिरू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24