मुंबईत वडापाव खाणं आता परवडणार नाही ?

Published on -

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरातील बेकरी, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट फूड विक्रेत्यांना लाकूड व कोळशाऐवजी स्वच्छ इंधन (Green Fuel) वापरण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश येत्या ८ जुलै २०२४ पर्यंत लागू करणे बंधनकारक असून, पालन न करणाऱ्या व्यवसायांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

या निर्णयामुळे वडापाव, ब्रेड, बन आणि इतर बेकरी उत्पादनांच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्यांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठी ही मोठी चिंता असू शकते, कारण वडापाव हा शहराचा ‘स्ट्रीट फूड किंग’ मानला जातो.

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि श्वसनासंबंधी आजार वाढत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने ९ जानेवारी २०२४ रोजी एक महत्त्वाचा आदेश दिला होता. या आदेशानुसार, व्यवसायांनी कोळसा आणि लाकडाचा वापर पूर्णपणे बंद करून स्वच्छ इंधनाकडे वळावे, यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई

महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले की, “लाकूड आणि कोळसा जाळल्याने प्रचंड प्रदूषण होते, ज्याचा परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर होतो आणि त्यामुळे अनेक श्वसनासंबंधी आजार वाढतात. त्यामुळे व्यवसायांनी स्वच्छ इंधनाचा वापर करावा, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”

पाव बनवण्यासाठी वीज वापरणे परवडणारे नाही…

मुंबईतील इंडियन बेकर्स असोसिएशनने BMC च्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. या संघटनेने महापालिका अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून बेकरी उद्योगासाठी वीज आणि इतर पर्यायी इंधन वापरणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, असे स्पष्ट केले. बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष के. पी. इराणी म्हणाले “पाव बनवण्यासाठी वीज वापरणे परवडणारे नाही. एलपीजी किंवा पीएनजीचा वापर हा काही प्रमाणात शक्य असला तरी, मुंबईतील सर्वच भागांत गॅस कनेक्शन सहज उपलब्ध नाही. शिवाय, बेकरी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा वापर करावा लागेल, ज्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो.”

वडापाव महागण्याची शक्यता ?

महापालिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम वडापाव आणि ब्रेडच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. लाकूड व कोळसा बंदीमुळे बेकरी व्यवसायावर अतिरिक्त खर्च वाढेल, जर व्यवसायांनी एलपीजी, पीएनजी किंवा वीजवर स्विच केले, तर त्याचा उत्पादन खर्च वाढेल, परिणामी, ब्रेड आणि बन्सच्या किमती वाढतील, ज्याचा थेट परिणाम वडापावच्या किमतीवर होईल. सध्या १५-२० रुपयांना मिळणारा वडापाव २५-३० रुपयांपर्यंत महाग होऊ शकतो.

उद्योग जगताची आणि नागरिकांची चिंता

मुंबईतील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या वडापाव, मिसळपाव आणि इतर बेकरी उत्पादने महाग झाली, तर सामान्य नागरिकांना मोठा फटका बसेल. स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी हा मोठा अडथळा ठरू शकतो.छोट्या बेकरी आणि हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता आहे. इंधना पुरवठा सुरळीत नसल्यास अनेक व्यवसाय अडचणीत येतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe