Talathi Bharti : तलाठी परीक्षा पुढे ढकलणार ? का भूमिअभिलेख विभागाकडून आली स्पष्ट माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharti : मराठा संघटनांचे आंदोलन, निदर्शने, बंदमुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलल्यास संबंधित कंपनीच्या नियोजनात अडथळा निर्माण होऊन तीन ते चार महिने पुढील परीक्षा घेण्यासाठीचा कालावधी लागून निकाल, नियोजन आणि मुलाखती, नियुक्ती आदी प्रक्रियेवर परिणाम होणार आहे.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही किंवा रद्दही करण्यात येणार नसल्याचे भूमिअभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आले. सध्या अंतिम म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहे.

तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यभरातून साडेअकरा लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४० हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित करण्यात आले.

त्यानुसार १७ ते २२ ऑगस्ट पहिला टप्पा, २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दुसरा टप्पा पार पडला असून, ४ सप्टेंबरपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोणत्याही कारणास्तव परीक्षा पुढे ढकलता येणार नाही किंवा रद्दही करता येणार नसल्याचे भूमिअभिलेखकडून सांगण्यात आले.

‘तलाठी भरती परीक्षेसाठी यंदा विक्रमी अर्ज आले आहेत. आतापर्यंत परीक्षेचे ४२ टप्पे पार पडले आहेत. ही परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. काही कारणांनी एखाद्या दिवशी परीक्षा रद्द झाली किंवा पुढे ढकलण्यात आल्यास पुढील तीन महिने परीक्षा घेता येणार नसल्याचे परीक्षा घेणाऱ्या कंपनीने कळवले आहे.

कारण या कंपनीकडून देशभरातील विविध परीक्षा घेण्यात येतात. तसेच राज्यात कुठेही निवडणूक आचारसंहिता लागल्यास त्या ठिकाणी परीक्षा घेता येत नाही. या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख विभागाकडून महसूल, जिल्हा प्रशासन पोलीस अशा सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.

तसेच एका दिवशी सुमारे ६० हजार उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन आहे.त्यामुळे या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलणे शक्य होणार नाही, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यालयातून सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक तहसील मुख्यालयी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. उमेदवारांना काहीही अडचण, समस्या असल्यास तातडीने या मदत कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय सोमवारी काही कारणांनी परीक्षेला पोहोचता आले नसल्यास आणि वेळेत संबंधित जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला असल्यास अशा उमेदवारांची जिल्हानिहाय माहिती संकलित करण्यात येत आहे, असेही रायते यांनी सांगितले