अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
हे अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून उपराजधानीत घ्यायचं की पुढे ढकलायचं याबाबतचा निर्णय येत्या सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कामकाज सल्ला बैठकीत घेण्यात येणार आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उपराजधानीत येत्या ७ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली. दरम्यान, तिसऱ्या लाटेचा इशारा व इतर कारणांमुळे पुढील सूचना आल्या नाहीत. विधिमंडळ सचिवालय गुरुवारपासून नागपुरात सुरू होणार होते.
तसं परिपत्रकही जारी करण्यात आलं, मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. प्रशासनानंही सर्व कामे थांबवल्याने अधिवेशनाच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला.
बऱ्याच दिवसांपासून कामकाज सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे अधिवेशन केव्हा, कुठे व किती दिवसांचे राहील, या अनिश्चिततेने संबंधित यंत्रणा संभ्रमात होती.
आता येत्या सोमवारी याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या अधिवेशनात शेतकऱ्यांची होणारी वीज तोडणी,
एसटी कामगारांचा प्रश्न आणि अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, आर्यन खान प्रकरण आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा मुद्दा उपस्थित करत राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून भाजपवर निशाणा साधला जाऊ शकतो.