Maharashtra News : शेतकऱ्यांनी दूध देणाऱ्या जनावरांचे टॅगिंग केल्याशिवाय भविष्यात कुठलेही अनुदान मिळाणार नाही, त्यासाठी टॅगिंग करून घ्यावे. वाळुमाफीयांना रोखण्याचे काम केले, त्याचप्रकारे दूध भेसळ करणाऱ्यांनासुध्दा रोखण्यात येत आहे.
ज्या गोष्टी समाजासाठी घातक आहेत, त्या रोखल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात चांगल्या प्रतीच्या दुध कसे मिळेल, यासाठी काम करणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
आगसखांड येथे साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना विखे बोलत होते. कार्यक्रमास आमदार मोनिकाताई राजळे, राहुल राजळे, सरपंच स्मिता लाड, अभय आव्हाड, भिमराव फुंदे, अमोल गर्जे, पांडुरंग सोनटक्के, अॅड. प्रतिक खेडकर, बप्पासाहेब कराळे, नितीन लाड, संजय कराळे, मधुकर देशमुख उपस्थित होते.
या वेळी बोलताना विखे म्हणाले, राज्यातील दुधातील भेसळ रोखायची असेल तर टॅगिंग आवश्यक आहे. राज्यात वाळूमाफियांनी मोठा उच्छाद मांडला होता. परंतू या वाळूमाफियांना चांगल्याप्रकारे रोखण्याचे काम झालेले आहे
अगदी त्याचप्रकारे दुधात भेसळ करणाऱ्यांवर राज्य शासनाच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाणार असून, चुकीच्या पध्दतीने दुधाची निर्मिती ही भविष्यातील लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. कोणी काही चुकीची कामे करत असेल तर पुढे येऊन ती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
राज्यात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, भेसळयुक्त दुधामुळे जनतेच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. शिवाय भेसळयुक्त दुधामुळे राज्यात दुधाचा कृत्रिम फुगवटा तयार केला जात आहे.
परिणामी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा रास्त दर मिळत नाही. दुधातील भेसळीला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे खा. विखे यांनी या वेळी सांगितले.