जागतिक वडापाव दिन : चाचा फेमस क्यूॅं है ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

आपल्या नाकापासून ओठांपर्यंत जेवढे अंतर असते तेवढेच अंतर संगमनेर आणि सामनापूर मध्ये आहे. नाकातोंडाचा संदर्भ एवढ्यासाठीच की, सामनापूर क्रॉस करताना वड्याचा खमंग वास नाकातून हृदयापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही, आणि तुम्ही संगमनेर ला जाताना सामनापूर मध्ये कंटेनर ला ओव्हरटेक करून गाडी डाव्या बाजूला दाबल्याशिवाय राहत नाही…आणि तिकडेच आपल्या ‘नसीब वाड्याच्या’ काउंटर वर आपली मेहनत अजमावत अन्सार इनामदार चाचा अगदी प्रसन्न मुद्रेने, “या मायबाप, असं सरकारी नियमाने लायनीत या… प्रचंड वेगाने….” म्हणत आपल्यात दडलेल्या ग्राहकाचा पुरेपूर सन्मान करत शिस्त पाळण्याचे आवाहन करतात. आपण ह्या रोड वरून जेव्हा जेव्हा जाऊ तेव्हा नसीब वाड्या समोरची खवय्यांची लांबलचक रांग तुमच्यातल्या वडाप्रेमीला चुंबकासारखी खेचून घेते.

लहानपणापासून अनेक व्यवसाय करत करत चाचा अखेर माणसाची आंतरिक गरज म्हणजे भूकेवर स्थिरावले आणि त्यातूनच नसीब उजाडलं. पण ह्याला नशीब कितपत म्हणावं हाही प्रश्नच आहे. जर नशीबच असतं तर इतर वडे किंवा तत्सम इतर पदार्थ हातोहात विकून तेही रातोरात प्रसिद्ध का झाले नाहीत ?

मूळात चाचांचा सक्सेस यूएसपी काय ह्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला असता त्यांनी एकच गोष्ट मला सांगितली ती म्हणजे, “बेटा, छोटा इगो बोहोत बडी चीझ है…आपले स्वत:चे छोटे छोटे इगो सांभाळत बसायला जिंदगी बोहोत छोटी है..” मुळात वडे सगळीकडे मिळतात, कमीत कमी किमतीत मिळतात.  पण नगररोड वरून प्रवास करणाऱ्यांना चुंबकाप्रमाणे आकर्षित करून घ्यायला चाचांचे आपलेपणाचे दोन शब्द कारणीभूत ठरतात.

कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एक एक ग्राहक मिळवण्यासाठी उभारली जाणारी महागडी कॅम्पेन्स पाहता, त्यातली चढाओढ पाहता, वडापाव विकणारे चाचा आपल्या सौम्य विनोदी शैलीमध्ये “खाता की नेता ? एखादी पिता का ?” म्हणत एका एका वाक्यागणिक ग्राहकांमध्ये कोणत्याही जाहिरातींशिवाय केवळ प्रत्यक्ष अनुभव देऊन ब्रॅन्ड लॉयल्टी बिल्ड करत राहतात. ही गोष्ट तुम्ही समजताय तितकी सोपी नाही. विशेष म्हणजे चाचांच्या स्वभावच इतका खरा आहे की दांभिकपणाचा लवलेशही त्यात जाणवत नाही. जे काही बोलतील ते अगदी दिल से…

एकदा की चाचा काउंटर वर उभे राहिले की “दादांना १० वडे दे प्रेमाने, नेता मध्ये कार्यक्रम राबवा, त्या अक्काला विचार काय हवे आहे ती तीन महिन्यापासून वाट पाहते आहे..” अश्या असंख्य कोट्या करत रांगेत उभे असणाऱ्या मायबाप ग्राहकांना चाचा आपल्या  खुमासदार विनोदी  शैलीमध्ये व्यग्र ठेवतात. चविष्ट वडे, ‘समुद्राचा झटका मारलेला चटका’ पाण्याची बॉटल आणि मुख्यतः ह्या सगळ्यांच्या बेस असलेली महाप्रचंड नम्रता आणि भाषेतील गोडवा ह्या भांडवलाच्या जोरावर अन्सार इनामदार चाचा गेल्या कित्तेक वर्षांपासून ग्राहकांचे क्षुधाशमन अविरतपणे करतायेत.

अन्सार इनामदार चाचा अनेक वर्षांपासून देत असलेली ही सेवा, कोणी नेटकऱ्यांनी शूट केली आणि सोशल मीडिया वर चाचांना एक वलय प्राप्त झाले. त्यांचे मिम्स बनले, ते शेअरही झाले. पण तरीही ह्या प्रसिद्धीने हुरळून न जाता चाचा बुद्धी आणि वाणीवरची पकड शाबूत ठेवतात. हल्ली त्यांना प्रथमदर्शनी भेटताना आपण कोणा सेलेब्रिटीशी बोलतो आहोत असे दडपण येऊही शकते पण दोन आपलेपणाचा शब्दांनी चाचा तुम्हाला नॉर्मलला आणून ठेवतात, प्रेमाने वडा कसा झालाय हेही  विचारतात.

पण हे YouTube वर व्हिडीओ पाहून भागणारे प्रकरण नाही आज जागतिक वडापाव दिन आहे, असं करा, सामनापूरला एक चक्कर मारा, तिथे चाचा तुम्हाला भेटतील, त्यांच्या इतकंच आदराने आणि प्रेमाने तिथली रांगेची शिस्त पाळा आणि खाता की नेता मधल्या, इथेच खाता या योजनेचा लाभ घेऊनच या.

#जागतिकवडापावदिन

Post By – साईकिरण कडुसकर.

अहमदनगर लाईव्ह 24