अहमदनगर :- दरवर्षी जिल्ह्यात सुरुवातीला कमी प्रमाणात पाऊस होतो. मुळा व भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र सुरुवातीला चांगला पाऊस होतो. ऑगस्टच्या मध्यात ही धरणे जवळपास भरत येतात.
परंतु, यंदा परतीच्या पावसामुळे व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात सध्या साठ्याची स्थिती चांगली आहे.
यंदा नोव्हेंबर महिना संपत आला असला, तरी भंडारदरा, मुळा व निळवंडे यांसह आठ प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा नव्हता.
प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार सन २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात निळवंडे, मुळा, आढळा या तीन प्रकल्पांमध्ये ५० ते ६० टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा होता, तर उर्वरित ८ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा होता.
परंतु, यंदा मात्र धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चांगली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील एकूण ११ प्रकल्पांपैकी एकाही प्रकल्पामध्ये १०० टक्के पाणीसाठा शिल्लक नव्हता, तर या अकरा प्रकल्पांपैकी तब्बल आठ प्रकल्पांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षाही कमी झालेला होता.
भंडारदरा – १०० टक्के, निळवंडे – १०० टक्के, मुळा – १०० टक्के, आढळा – १०० टक्के, मांडओहोळ – १०० टक्के, घाटशीळ पारगाव – ९५ टक्के, सीना ७५ टक्के, विसापूर – १०० टक्के, मुसळवाडी ९८ टक्के, टाकळीभान १०० टक्के आहे. धरणांत मुबलक पाणीसाठा असल्याने यावर्षी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.