अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
विदेशात करोनाचा नवीन प्रकार B.1.1529 आढळल्यानंतर मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. कोविडच्या नव्या प्रकाराचे रुग्ण बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँगमध्ये आढळून येत आहेत.
त्यामुळे विदेशातून येणाऱ्या नागरिकांची सखोल चाचणी करावी आणि त्यापैकी कोणी प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचे नमुने INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेत पाठवावेत, असे निर्देश मंत्रालयाने दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.सूत्रांच्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत शास्त्रज्ञांना नुकताच कोरोना व्हायरसचा हा प्रकार आढळला आहे.
करोनाचा हा नवीन प्रकार गंभीर चिंता करण्यासारखा आहे कारण या प्रकारात असामान्यपणे मोठ्या प्रमाणात म्यूटेशन म्हणजे बदल होत आहेत. करोनाचा हा नवीन वेरियंट मागील प्रकारांपेक्षा खूप वेगळा असल्याचे सांगितले जात आहे. करोनाच्या या प्रकाराला B.1.1529 म्हटले जात आहे.
करोनाच्या नवीन वेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने संबंधित विभागांना कठोर निर्देश दिले आहेत. त्यात विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर तिहेरी देखरेख ठेवणे आवश्यक आहे. यासह आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी आणि चाचणी काटेकोरपणे व्हायला हवी.
अशा पॉझिटिव्ह रुग्णांचे RTPCR अहवाल नियमितपणे जीनोम सिक्वेन्सिंग लॅब INSACOG कडे पाठवण्यास सांगिण्यात आले आहे. दरम्यान, देशभरात करोना संसर्गाचे रुग्ण कमी झाले होते. पण आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या ९ दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर कोरोना मृत्यूदर १२१ टक्क्यांनी वाढला आहे.
देशभरात १५ नोव्हेंबरला १९७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. तर २३ नोव्हेंबरला ही संख्या ४३७ झाली.त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या भीतीने केंद्र सरकारही सतर्क झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी १३ राज्यांना पत्र लिहून घटत्या कोरोना चाचणीच्या संख्येवर चिंता व्यक्त करत त्या वाढविण्याबाबत कळविले आहे.