अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- हवामान बदलामुळे दक्षिण भारतातील पावसाचे चक्र बदलण्याची भीती आहे. हवामान बदलाने उष्णकटिबंधीय पावसाच्या पट्ट्यात असमान बदल होऊन देशाच्या अनेक भागात भीषण पुराच्या घटना वाढू शकतात, असा इशारा वैज्ञानिकांनी नवीन अभ्यासाद्वारे दिला आहे.
अत्याधुनिक हवामान मॉडेलचा अभ्यास करून भविष्यातील विविध धोके संशोधकांनी अधोरेखित केले आहेत. चालू शतकात उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये अतिशय वेगाने हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढत आहे. त्यामुळे या पट्ट्यात होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांचा आढावा अभ्यासात घेण्यात आला आहे. त्यानुसार पूर्व आफ्रिका आणि हिंदी महासागरावरील उष्णकटिबंधीय पावसाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने दक्षिण भारतामध्ये पुराची तीव्रता वाढू शकते.
इतकेच नाही, तर यामुळे २१०० सालापर्यंत जागतिक जैव विविधता आणि अन्न सुरक्षेला याचा मोठा फटका बसू शकतो, असा धोक्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. हवामान बदलामुळे होत असलेला हा मोठा बदल यापूर्वीच्या अभ्यासातून समोर आला नाही. पण नव्या अभ्यासातील निष्कर्ष चिंतेत टाकणारे आहेत.
हवामान बदलामुळे आशिया आणि उत्तर अटलांटिक महासागरातील तापमानात वाढ झाली आहे. एरोसोल उत्सर्जनातील प्रस्तावित कपात, हिमालय आणि उत्तरेकडील भागातील बर्फ वेगाने वितळत असल्याने इतर परिसरांच्या तुलनेत येथील तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. याच कारणामुळे पावसाच्या पट्टीत बदल होत आहेत, असे संशोधनाचे म्हणणे आहे.