जळगाव, दि.२७ :- जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्कालीन स्थिती उद्वभल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यात ८ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली असून कोरोनाच्या प्रतिकारासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
तसेच कापूस लागवडीबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली असून १ मे ला जिल्ह्याच्या खरीप हंगामाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहितीगुलाबराव पाटील यांनी दिली.
अलीकडच्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि कापूस लागवड संदर्भात आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांकडून अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा घेतला.
यावेळी जिल्हा रूग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस.खैरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, कृषी विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी वैभव शिंदे यांची उपस्थिती होती.
गेल्या आठवड्यापासून अमळनेर आणि भुसावळ तालुक्यात कोरोनाबांधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. तर मालेगावमुळे चाळीसगाव तालुक्यालाही संसर्गाचा धोका संभवत असल्याने या तीनही तालुक्याच्या सिमा अत्यावश्यक सेवा वगळून इतरांसाठी बंद झाल्या पाहिजे अश्या सुचना देण्यात आल्या.
भविष्यात कोरोनाग्रस्तांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात एकुण ८ हजार बेडची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण रूग्णालयात आयसोलेशन वार्डची सुविधा उपलब्ध करून दिली असून तालुका प्रशासन यासाठी सज्ज आहे. तसेच जिल्ह्यास जास्तीत जास्त पीपीई किट उपलब्ध व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
व्हेंटीलेटरसाठी मदतीचे आवाहन
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, संशयितांचे रिपोर्ट लवकरात लवकर उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी प्रयोगशाळेचे काम ८० टक्के पुर्ण झाले असून त्यासंबंधित मशीनरी येताच संशयित कोरोनाग्रस्तांचे स्वॅब तपासणीची सोय जिल्ह्यातच कार्यन्वित होईल.
जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांसाठी व्हेंटीलेटरची आवश्यकता असल्याने जिल्ह्यातील दानशुर व्यक्तींनी पुढे येवून रूग्णांसाठी व्हेंटीलेटरची व्यवस्था करण्यास मदत करावी. असे आवाहनही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
२५ मे नंतर लागवड करावी
राज्याचे कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याशी कापूस बियाणे उपलब्धतेविषयी व लागवडी बाबत बोलणे झाले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्या दरम्यान जिल्ह्यातील मान्यताप्राप्त कृषी केंद्रांवर शेतकर्यांसाठी कापूस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली.
शेतकर्यांना कापुस बियाणे जरी लवकर उपलब्ध झाली तरी बागायती कापुस लागवड २५ मे नंतरच करावी. कारण मे महिन्याच्या मध्यावधीत तापमान ४५ ते ४७ अंश से. पर्यंत असते, त्यामुळे जास्त तापमानात लागवड केल्यास बियाण्याची उगवण क्षमतेची टक्केवारी कमी होते. उगवले तरी नवीन अंकुर वाळुन प्रती हेक्टरी झाडांची संख्या कमी होते.
यामुळे मुळांची वाढ समाधानकारक होत नाही. पाने लाल होऊन झाडांची वाढ खुंटते व मर रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे उत्पन्नात घट होते. त्याचप्रमाणे लवकर लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले.
मान्यताप्राप्त कृषी केंद्रांवरूनच खरेदी करा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बियाणे, खते, पुर्व मशागत, ठिबक संचाची जोडणी इ. कामांचे चांगले नियोजन मे महिन्यात करुन २५ मे नंतरच कापुस बियाण्यांची लागवड करावी.
त्यामुळे आपला उत्पादन खर्च सुद्धा वाचेल व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होऊन चांगले उत्पन्न मिळेल. यासाठी शेतकर्यांनी नकली बियाणांच्या आहारी न जाता मान्यताप्राप्त कृषी केंद्रावरून कापसाचे बियाणे खरेदी करावे, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.