अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-25 वर्षे विना अपघात ज्या चालकांची सेवा झाली आहे, अशा चालकांना यापुढे राज्य स्तरावर सत्कार करून, 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
एसटी महामंडळाकडून 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान रस्ते सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचं उद्घाटन अनिल परब यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल आगार येथे पार पडलं.
यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना परब म्हणाले कि, एसटी महामंडळात गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ विनाअपघात सेवा देणारे भारत कोल्हे, कीर्ती कुमार पाटील, परशुराम बंडेकर, सुदेश समुद्रे,
महादेव जगधने या मुंबई विभागातील 5 चालकांचा परिवहनमंत्री परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.
तर, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, केवळ एसटीच्या प्रवाशांचेच नव्हे तर रस्त्यावरील चालणाऱ्या पादचाऱ्यांपासून सर्व प्रकारच्या लहान-मोठ्या वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा संस्कार एसटीच्या चालकांत रुजविणे हा रस्ते सुरक्षितता अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
तसेच चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्यांचेही आपण कौतुक करायला पाहिजे.
ज्या चालकांनी 25 वर्ष विना अपघात सेवा दिली आहे. त्यांना यापुढे 25 हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, असं परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलंय.