मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमताचा जनादेश दिला हाेता. शिवसेना- भाजपमध्ये समन्वय हाेऊन जर चर्चा झाली असती आणि भाजपने दाेन पावले मागे घेऊन शिवसेनेला एक- दाेन वर्षे मुख्यमंत्रिपद दिले असते तर राज्याची सत्ता महायुतीकडे कायम राहिली असती,’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला.
‘नाराजांची मोट बांधायची गरज नसते, तर ते आपोआपच एकत्र येतात,’ असे सूचक वक्तव्यही खडसेंनी केले. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पक्ष साेडणार असल्याच्या वावड्या उठल्या तेव्हा खडसेंनी तसे काही हाेणार नसल्याचे स्पष्ट केले हाेते.
मात्र पंकजा व आपली कन्या राेहिणी यांच्या पराभवाला पक्षातील काही लाेकच कारणीभूत असल्याचा जाहीरपणे आराेपही केला हाेता. तसेच या प्रकरणाची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करूनही काही उपयाेग झाला नसल्याची नाराजीही खडसे यांनी जाहीरपणे व्यक्त केली हाेती.
या पार्श्वभूमीवर खडसे यांनी बुधवारी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. दाेन दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनाेद तावडे यांनीही पंकजा यांची भेट घेतली हाेती, त्यापाठाेपाठ बुधवारी त्यांनी खडसेंचीही भेट घेतली. काैटुंबिक साेहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतल्याचे तावडे सांगत असले तरी खडसेंच्या नाराजीविषयी या भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जातेे.
पत्रकारांशी बाेलताना खडसे म्हणाले, ‘गाेपीनाथ मुंडे माझे चांगले मित्र हाेते, त्यामुळे या कुटुंबाशी आमचे जुने नाते आहे. आजची भेट ही काैटुंबिकच हाेती.
पंकजा व राेहिणी यांचा पराभव पक्षातील लाेकांमुळेच झाल्याचे मी यापूर्वीच नेत्यांना नावानिशी कळवले आहे. आता कारवाईची प्रतीक्षा आहे. खालच्या माणसांना बोलण्यात अर्थ नाही.
ज्यांनी हे निर्णय घेतले, त्यांनाच दोष द्यावा लागेल. पक्षाचे नेते जसे यशाचे भागीदार असतात, तसे अपयशाचेही व्हावे,’ असा टाेलाही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लगावला.