अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावेळी देशात सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका आला. आणि सगळे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षांना पावसाने पाण्यात बुडवून टाकले आहे.
एक एकर बाजरी सोंगायला मजुर त्याच्याकडे सहा हजार रूपये मागतात. खिसा रिकामा झाला. त्यामुळे तुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय अशी काहीशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येत आहे. शिर्डी मधील जळगाव हे आदर्श शेती करणारे गाव.
तिन दिवसांपूर्वी येथे अवघ्या दोन तासात सत्तर मिलीमिटर पाऊस झाला. आधिच ओल्या असलेल्या जमिनीत तळी साचली. त्यात खरिपाची पिके अक्षरशः बुडून गेली. सोयाबीन आणि द्राक्षबागांचे शंभर टक्के नुकसान झाले. पावसामध्ये वार्याचेही प्रमाण असल्याने मका व ऊस शेतीचे नुकसान झाले.
या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले.
परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. गंगाधर पाटील चौधरी व भाऊसाहेब पाटील चौधरी हे येथील जाणकार आणि प्रतिष्ठीत शेतकरी.
त्यांनी पिकविलेला उस पहायला कृषि विद्यापिठाचे कुलगूरू शेतावर येतात. यंदा उस खाली लोळला. पांढरी व तपकिरी ठिपक्याने त्याचा सत्तानाश केला. सोयाबिन पाण्यात बुडाले. द्राक्षबागांची मुळे कुजली आणि जमिनी एेवजी शेंड्याकडे नवीन मुळे फुटली. शंभर टक्के नुकसान.
त्याला पंचनाम्याची मुळीच गरज नाही. एवढे नुकसान आणि पाऊस गेल्या आम्हाला आठवते तसे पन्नास ते साठ वर्षात अनुभवला नाही. मायबाप सरकारने तातडीने व सरसकट भरपाई दिली तरच गावातील शेतकरी रब्बीची पिके घेऊ शकतील. अन्यथा पाणी असून शेती पडीत राहील. अशी कैफीयत हताश झालेल्या शेतक-यांनी मांडली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved