अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : शुक्रवारी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या शहरातील प्रभाग दोनमधील ६० वर्षीय व्यक्तीचा पहाटे साडेचार वाजता नगर येथे सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना बाधित व्यक्तीचा मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चक्क श्रीरामपूरला नेऊन कुटुंबियाच्या ताब्यात दिला. ही गंभीर चूक लक्षात येताच जिल्हा रुग्णालयाने कुटुंबीयांना मृतदेह परत नगर येथे पाठवण्यास सांगितले. मात्र तोपर्यंत श्रीरामपूर येथे अंत्यविधी पार पडला होता.
बुधवारी, ३ जून रोजी शहरातील प्रभाग दोनमधील एका साठ वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. न्युमोनियाची लक्षणे आढळल्याने त्यांना नगरला नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या घशातील स्राव घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
शुक्रवारी सायंकाळी सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनतर लगेच आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांना क्वारंटाइन केले. शनिवारी पहाटे नगर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल नातेवाईकांना देण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.
मृतदेह नातेवाईकांनी श्रीरामपुरात आणल्यानंतर परंपरेप्रमाणे दफनविधीची तयारी केली. लोकही जमले अन् नगरहून नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाने फोन केला की हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आपण त्यावर अंत्यसंस्कार करू नये. मृतदेह कोरोनाचा असल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांना माहीत नव्हते.
त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मृतदेह नगरला पाठवण्याची विनंती केली. संबंधित रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी सूचना त्यांनी केली. वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णाचा मृतदेह नगरला पाठवण्याचे मला सांगितले असल्याचे महिला कर्मचाऱ्याने कुटुंबीयांना सांगितले. मात्र, दफनविधीची पूर्ण तयारी झाली होती.
माहिती कळल्यावर प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांना कळवले. डॉ. शिंदे हे पोलिस फौजफाट्यासह दफनभूमीत गेले.त्यावेळी नातेवाईकांच्या उपस्थितीत दफनविधी सुरू होता. शेवटी डॉ. शिंदे यांनी दफनविधीची ताबा घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार दफनविधीची प्रक्रिया पूर्ण केली.
या निमित्ताने करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जातोच कसा? एका शहरातून दुसऱ्या शहरात मृतदेह नेला जातोच कसा? असे प्रश्न निर्माण झाले असून जिल्हा रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews