भाईगिरी आली अंगलट; श्रीगोंदा तालुक्यातील युवा नेत्याला बेदम चोप !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- काष्टी येथे २१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राउंडवर आलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांना उलट उत्तर देत अर्वाच्च भाषा वापरल्याने काष्टीतील युवा नेत्याला बेदम चोप देण्यात आला. या प्रकाराची तालुक्यात चर्चा रंगली आहे.

२१ रोजी काष्टी येथे रात्री ९ च्या सुमारास राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी आपले कर्तव्य बजावत होती. अकारण बाहेर फिरणाऱ्या काही युवकांना त्यांनी लाठ्यांचा प्रसाद दिला.

यावेळी आपल्या आलिशान वाहनातून निघालेले युवा नेते पोलिसांना भाईगिरीच्या भाषेत समजवायला गेले. मग जवानांनी बाकीच्यांना तेथून हाकलून देत आपला मोर्चा या नेत्याकडे वळवला.

आता हे प्रकरण आपल्यावर बुमरँग होईल हे लक्षात आल्यावर त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु जवानांनी पाठलाग करत त्या नेत्यास गाठत त्याची यथेच्छ धुलाई केली.

विशेष म्हणजे यावेळी त्या नेत्याच्या कुटुंबातील काही सदस्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काडीमात्र फरक पडला नाही. उलटपक्षी तिथे गोळा झालेल्या आसपासच्या रहिवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत या घटनेचा ‘याची देही, याची डोळा’ अनुभव घेतला.

कालांतराने या नेत्याच्या वेदनांची कीव येऊन पोलिसांनी माणुसकी दाखवत आपले कार्य थांबवून त्याला शेवटी ताकीद देऊन सोडून दिले. या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

अहमदनगर लाईव्ह 24