अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने वाहनांना आरसे नसल्यामुळे वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत या कारवाईचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.
परंतु नव्या वर्षात टोलनाक्यापासून गाड्यांपर्यंतचे नियम बदलू लागले आहेत. या नव्या नियमानुसार विनाआरसा वाहन चालविणाऱ्यांना पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे.
तरुण मुलांमध्ये विनाआरसा गाडी चालवण्याचे प्रमाण जास्त असते. गाडीला आरसा नसल्यास चालकास मागच्या गाड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडतात.
यावर आळा घालण्यासाठी वाहनांचा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात झाल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, १५ डिसेंबर पासून सर्व टोल नाके कॅशलेस झाले असले तरीही कॅश लेनही सुरु राहतील मात्र त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार असल्याचे ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले, टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होत असते.
काही वेळेला दोन दोन तास वाट पाहावी लागते. त्यामुळे नागरीकांचा नाहक वेळ वाया जातो. जर फास्ट टॅग प्रत्येक वाहनांना लावले गेले तर टोल नाक्यावर वाहकूत कोंडी होणार नाही.
त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत देखील होईल आणि टोल नाक्यावर वसूल केल्या जाणाऱ्या पैशांची मोजदाद करणे देखील सोयीस्कर होईल त्यामुळे प्रत्येक गाडीवर फास्ट टॅग असणे गरजेचे आहे असही मत यावेळेस त्यांनी व्यक्त केले.