३१ जानेवारी २०२५ धुळे : आर्थिक फायद्यासाठी महाविद्यालयीन तरुण-तरुणींना एकांतात स्वैराचार करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या कॅफे विरुद्ध धुळे शहराचे आ. अनुप अग्रवाल यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील व पोलीस, मनपा प्रशासनाने धडक कारवाई केली.या कारवाईत कॅफेमध्ये अश्लील चाळे करताना २२ महाविद्यालयीन तरुण-तरुणींना रंगेहाथ पकडण्यात आले.यावेळी मनपा प्रशासनाकडून अवैध कॅफेवर हातोडा मारण्यात आला.याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात कॅफे चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील देवपूर भागात असलेल्या शाळा, महाविद्यालय परिसरात आर्थिक फायद्यासाठी काही जणांकडून कॅफे उघडण्यात आले आहेत.या कॅफेच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुण-तरुणींना एकांतात स्वैराचार करण्यासाठी स्वतंत्र केबिन तयार करून याद्वारे तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडूनच्या कारवाईनंतर पुन्हा हे कॅफे सर्रासपणे चालू असल्याने काही नागरिकांकडून शहराचे आमदार अनुप अग्रवालांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.या तक्रारींची दखल घेऊन आ. अग्रवाल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील व देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन देवपुरातील कॅफेवर धडक कारवाई केली.
गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून कॅफेवरील धाडसत्र सुरू करण्यात आले. देवपूर भागातील एकूण १० कॅफेवर छापा टाकण्यात आला.यातील डीलाईट कॅफे, शाईनिंग कॅफे, रॉयल लॉज, विथ यू कॅफे, शुगर कॅफे या ५ कॅफेंमध्ये एकूण २२ महाविद्यालयीन तरुण-तरुणी कॅफेच्या आतमध्ये तयार करण्यात आलेल्या केबिनमध्ये अश्लील चाळे करताना रंगेहाथ आढळले.
सर्व विद्यार्थ्यांना तसेच कॅफे चालक, मालकांना ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्या तरुण-तरुणींना समज देऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी कॅफे चालक, मालक यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.