अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :-  एटीएममध्ये नवीन एटीएम कार्ड सुरू करून देण्याच्या बहाण्याने एकाने हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल केल्याची घटना संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानाजवळील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये घडली.

त्यानंतर भामट्याने सिन्नर येथील एका एटीएम सेंटरमधून ३१ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, भास्कर मारुती घुले (रा. कौठे धांदरफळ) दुपारी दीडच्या सुमारास शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये वडिलांच्या नावे असलेले नवीन कार्ड सुरू करण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यात त्यांना तांत्रिक अडचण आल्याने, शेजारी उभ्या असलेल्या एकाने मदत करण्याच्या बहाण्याने पिन क्रमांक जाणून घेत, पैसे निघत नसल्याचे सांगितले. हातचलाखीने जुने एटीएम कार्ड घुले यांना दिले.

त्यांच्या कार्डाचा उपयोग करून सिन्नरच्या एका एटीएम सेंटरमधून खात्यावरील ३१ हजार रुपये काढून घेतले. घुले यांनी नवीन एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी बँकेशी संपर्क साधला असता, खात्यातून पैसे काढल्याचे समजले.