अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news  :- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला जोडून इतरही पक्षांनी विविध ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत.

त्यामुळे ३० एप्रिल आणि १ मे रोजी राज्यातील प्रमुख शहरांत सर्वच पक्षांचे झेंडे फडकतील आणि ‘भोंगे’ही वाजतील, अशी परिस्थिती आहे. राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्याकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना इतरही पक्षांनी आपल्या सभा आयोजित केल्या आहेत.

महाविकास आघाडीने आदल्या दिवशीच म्हणजे ३० एप्रिलला सायंकाळी पुण्यात निर्धार सभा घेण्याची घोषणा केली आहे. पुण्यातील अलका चौकात ही सभा होईल.

राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत. काँग्रेसकडून मंत्री यशोमती ठाकूर सहभागी होणार आहेत तर शिवसेनेकडून राज्याच्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याला आमंत्रण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील राजकीय परिस्थितीत सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी या निर्धार सभेचे आयोजन करण्यात आल्याचे आघाडीतर्फे सांगण्यात आले.

भाजपनेही १ मे रोजी मुबंईत जाहीर सभा आयोजित केली आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावर होणाऱ्या या सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख भाषण होणार आहे.

सध्या सुरू असलेल्या राजकीय विषयांवर भूमिका मांडण्यासाठी ही सभा आयोजित केल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेनेही १ मे रोजीच पुण्यात सभा आयोजित केली आहे.

पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या सभेला संबोधित करणार आहेत. आपल्याला मास्क काढून अनेकांचा समाचार घ्यायचा आहे, असे ठाकरे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

त्यानुसार शिवसेनेनेही एक मे हाच दिवस निवडला आहे. वंचित बहुजन आघाडीनेही १ मे रोजी राज्यात ठिकठिकाणी शांती मोर्चे आयोजित केले आहेत. सध्या राज्यातील वातावरण बिघडले आहे.

त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे शांती मोर्चे काढण्यात येणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. अर्थात एकट्या ठाकरे यांच्याकडे फोकस जाऊ नये, हा या सर्वच पक्षांचा हेतू असल्याचे दिसून येते.

गुढीपाडव्याची सभा आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभा आणि आता औरंगाबादच्या सभेवरून ठाकरे यांचीच जास्त चर्चा सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी हाच दिवस निवडून आपल्याकडेही जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते.