अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 maharashtra news  :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचारी आंदोलकांनी केलेल्या उग्र आंदोलनाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत.

जसजसा तपास पुढे जाईल, तसे त्यातील काही बारकावे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे.

“या आंदोलकांचा पवारांना शारीरिक इजा पोहचविण्याचा हेतू होता,” असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. यासंबंधी एका ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे, “परवा साहेबांच्या घरी हल्ला झाला.

हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वछ नव्हता. त्यांनी साहेबांच्या घराची रेकी केली होती, आणि त्यांना पवार साहेबांना शारीरिक इजा करायची होती.

महाराष्ट्राचे नशीब असे काही घडले नाही.” या घटनेचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधी चौकशी करण्यासाठी एक समितीही नियुक्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यातून बऱ्याच गोष्टी उघड होत असून चौकशीत बरीच माहिती पुढे येत असल्याचे सांगण्यात येते.

त्याच आधारे आव्हाड यांनी हे ट्विट केल्याचे दिसते. दरम्यान, या घटनेवरून गृहमंत्रालयावर चोहोबाजूंनी टीका झाली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना बदलण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याऐवजी जितेंद्र आव्हाड किंवा राजेश टोपे यांच्याकडे गृहखाते सोपविण्यात यावे, अशी मागणीही होत आहे.