अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून परतणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या निवासस्थानी भेट दिली.

गेल्या काही काळापासून नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लंके यांचे नाव पुढे येत आहे. लंके हे पवार यांच्या गुडबुकमधील मानले जातात.

आता पवार यांनी थेट लंके यांच्या निवास्थानीच भेट देऊन लंके यांना आणखी बळ दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आता याच जागेसाठी राष्ट्रवादी पुन्हा जोमाने तयारीला लागल्याचे सांगितले जाते.

मधल्या काळात शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांचा पराभव करून आमदार झालेले लंके राष्ट्रवादीसाठी नवी आशा निर्माण झाले आहेत.

गेल्या काही काळापासून त्यांच्याच नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे. त्यांनीही पक्षाने जबाबदारी दिली तर आपली तयारी असल्याचे वक्तव्य केले होत.

करोना काळात त्यांनी लक्षणीय काम केल्याने सर्वत्र चर्चा झाली. लंके यांची काम करण्याची पद्धत, त्यांची साधी राहणी या सोबत त्यांच्या साध्या घराचीही चर्चा असते. त्याच घरी आता पवार यांनी भेट देऊन जणू लंके यांना बळ दिल्याचे मानले जात आहे.