Mobile recharge:स्वस्तातील प्लॅन देत असल्याचे भासवत अनेक मोबाईल कंपन्यांनी २४ व २८ दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन आणले आहेत.

मात्र, यातून प्रत्यक्षात ग्राहकांचा फायदा होत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने (TRAI) देशभरातील सर्व मोबाईल ग्राहकांना दिलासा देणारा नवीन आदेश जारी केला आहे.

आता दूरसंचार पुरवठा कंपन्यांना आपला किमान रिचार्ज व्हॅलिडीटी प्लॅन ३० दिवसांचा ठेवावा लागणार आहे. ग्राहकांकडून मागणी झाल्यानंतर यावर्षी एप्रिल महिन्यात ट्रायने या संदर्भात दूरसंचार कंपन्यांना सूचित केले होते.

दूरसंचार कंपन्यांचा प्लॅन व्हाउचर आणि प्लॅन व्हाउचर नूतनीकरण करताना किमान एक असा दर आणावा तसेच त्याची किमान वैधता ३० दिवसांची असावी, असे म्हटले होते.

मात्र, त्यात बदल होत नसल्याचे पाहून आता थेट आदेशच काढण्यात आला आहे. यानुसार आता दूरसंचार सेवा प्रदाता कंपन्यांना २४ व २८ दिवसांच्या ऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज कूपन आणि विशेष व्हाउचर ऑफर करावे लागणार आहेत.