अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- कौटुंबिक प्रसंग असोत की धार्मिक उत्सव… सोने हा भारतीय ग्राहकांच्या सांस्कृतिक गरजांचा अविभाज्य भाग आहे. भौतिक मालमत्ता म्हणून दागिने बनवण्यासाठी पिवळा धातू महत्त्वाचा मानला जातो. तसेच सोने स्वरुपातील संपत्ती विक्री करण्यायोग्य मानली जात नाही.
तथापि, पुरवठा आणि मागणीच्या चक्रात योगदान देणा-या अनेक निर्धारकांप्रमाणे हे घटकही सोन्याच्या बाजारावर परिणाम करतात. इतर घटकांमध्ये आर्थिक, नियामके, सांस्कृतिक कल, महागाई, समृद्धी इत्यादींचा समावेश होतो. तथापि, सोन्याच्या दरावर प्रभाव पाडणारे ५ प्रमुख घटक खालीलप्रमाणे:
आर्थिक अनिश्चितता: एखाद्या संकटामुळे जेव्हा आर्थिक वृद्धी थांबते, तेव्हा मागणी आणि पुरवठ्यातील अनिश्चित चढ उतारांचा परिणाम इक्विटी मार्केट, जागतिक व्यापार आणि एकूणच वित्तीय प्रणालीवर होतो. गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांद्वारे त्यांची गुंतवणूक सुरक्षित ठेवू इच्छितात,
त्यामुळे अशा प्रकारच्या अनिश्चिततांमुळे त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणावे लागते. अशा स्थितीत, लोक गुंतवणुकीकरिता मालमत्ता वर्गाकडे वळतात. यात सोन्याला पहिली पसंती मिळते. परिणामी मागणी वाढते आणि त्यानंतर त्याचे दर वाढतात.
याच पार्श्वभूमीवर, सध्या जगभरात आर्थिक अनागोंदी माजवणा-या कोव्हिड-१९ च्या काळात आपल्या देशातील सोन्याचे भावही वाढलेत. फक्त एप्रिल महिन्यात सोने ११ टक्क्यांनी वाढले. सहा महिन्यांच्या काळात सोन्याच्या दरांनी डिसेंबर २०१९ मधील ३०,००० रुपयांवरून आजपर्यंत ५४,००० रुपयांचा दर गाठला.
सरकारची धोरणे: सोन्याच्या पहिल्या दोन जागतिक ग्राहकांमध्ये भारताचा समावेश होतो आणि सरकारच्या अनेक निर्णयांचा परिणाम प्रामुख्याने सोन्याच्या दरांवर होतो. आरबीआय जेव्हा व्याजदर, वित्तीय धोरणे, वार्षिक सोन्याचे अधिग्रहण, सार्वभौम बाँड्स इत्यादींची घोषणा करते,
तेव्हा या सर्वांचा परिणाम बाजारातील भावनांवर होतो. यामुळे दर कमी जास्त होतात. उदाहरणार्थ, संकटकाळातील आर्थिक बेलआऊट पॅकेज, मालमत्तांवरील कर आकारणी आणि इतर सूक्ष्म धोरणे हे सर्व सरकारवर अवलंबून असतात.
असे निर्णय अनेकदा आर्थिक संकटाचे समग्र आर्थिक परिणाम लक्षात घेऊन घेतलेले असतात. तथापि, रोखीचा पुनर्प्रवाह आणि कमोडिटी मार्केटमधील तीव्र वृद्धी यावर आर्थिक सुधारणा अवलंबून असतात.
महागाई: आर्थिक घसरणीवर उपाययोजना करताना, अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी सरकार अनेकदा मल्टी-बिलियन डॉलरचे प्रोत्साहन पॅकेजेस जाहीर करतात. यामुळे अशी वातावरण निर्मिती होते की, नागरिक अतिरिक्त खर्च करतात. तथापि, अनेकजण सोन्यात गुंतवणूक करून त्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात.
मागील दोन दशकांतील पुराव्यांवरून, जागतिक आर्थिक मंदीनंतरच्या महागाईमुळे सोन्याच्या दरात कशी वाढ होत गेली, हे दिसून येते.
त्यानंतर, चलनवाढीच्या काळात सोन्याची बाजारपेठ जुळवून घेऊ शकते, हा विश्वास नेहमी खरा सिद्ध होतो. कारण घाबरलेले गुंतवणूकदार बहुतांश वेळा गोल्ड एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ईटीएफ), सार्वभौम बाँड्स आणि सर्वसाधारणपणे सोन्याच्या मालमत्ता वर्गात गुंतवणुकीद्वारे चलनवाढीनंतर होणाऱ्या परिणामांवर नियंत्रण ठेवतात.
लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्र: भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांच्या वर्णनांकडे अनेकदा वरदान म्हणून पाहिले जाते. या विश्वासामुळे वृद्धीच्या संधी निर्माण होण्यास मदत होते. आपली लोकसंख्या सर्वात तरुण असून इथे ५०% पेक्षा जास्त लोक ४० वर्षे वयाखालील आहेत.
त्यामुळे अनेक संस्था मिलेनियल्स आणि तरुण व्यावसायिकांच्या खर्चाच्या पद्धतीत बदल करण्याच्या अपेक्षेत असतात. ही अपेक्षा म्हणजे, हे सोन्याच्या मालमत्ता वर्गात गुंतवणूक करतील. मग ते भौतिक मालमत्ता स्वरुपात घेतील किंवा इतर स्वरुपात.
पारंपरिक पद्धतीत, सोने खरेदी करण्यासाठी घरातील ज्येष्ठ व्यक्ती व्यापाऱ्याची दुकाने किंवा दागिन्यांच्या दुकानांना प्रत्यक्ष भेट देत असत. सध्या, अनेक पर्याय आहेत.
उदा. सरकारचे सार्वभौम सोन्याचे बाँड्स आणि ई-गोल्ड हे डिजिटल पेमेंटद्वारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिजिटल सर्व्हिस प्रदात्यांसाठी मिलेनियल्स हे टार्गेट ग्राहक आहेत. कारण केवळ एका क्लिकच्या बटणाद्वारे, खरेदी-विक्रीच्या सोप्या सुविधेमुळे ते प्रत्यक्ष सोन्याच्याही पुढे जाऊन गुंतवणूक करू शकतात.
यासह, सोने हा दक्षिण आणि पश्चिम भारतीय संस्कृती आणि धार्मिक विधींचा अत्यावश्यक भाग आहे. सण-उत्सवाच्या काळात अनेकदा सोन्याचे दर वाढतात. सोन्याचे दागिने घेण्यासाठी लोक नेहमीच सराफ्याकडे गर्दी करतात. कारण दागिने हे भारतीयांच्या सोन्याच्या वापरातील अविभाज्य घटक बनले आहेत.
वाढते उत्पन्न: गेल्या काही दशकांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अनेक पटींनी वाढली आहे. मध्यम उत्पन्न गटातील उत्पन्नातही वाढ झाली आहे. परिणामी त्यांच्या क्रयशक्तीवरही परिणाम झाला आहे. संपत्ती निर्मितीचे विविध कमोडिटी मार्केटवर अनेक अनपेक्षित परिणाम होतात. भारत सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने नव्याने निर्माण झालेल्या संपत्तीमुळे अतिरिक्त खप झाला आहे.
उत्पन्न वाढत असल्याने लोक सोने-मालमत्ता वर्गात खरेदी आणि गुंतवणूक करत आहेत. भारत हा कुटुंब आधारीत समाज असल्याने अतिरिक्त उत्पन्न खर्चात रुपांतरीत होते.
यामुळे जास्तीत जास्त उत्पन्नामुळे जास्त खर्च केला जातो. यात बहुतांशवेळा सोने खरेदीला मान मिळतो. काही प्रसंगांमध्ये सोन्याचे दागिने हे प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. जागतिक गोल्ड कौंसिलच्या ताज्या अभ्यासानुसार, उत्पन्नातील प्रत्येक लहानशा वाढीचे परिणाम सोन्याच्या दरवाढीवर होतात.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved