Agri Related Business:- कांद्याच्या बाबतीत सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हा दराच्या बाबतीत असतो. आपल्याला माहित आहे की कांद्याचे दर कायमच मोठ्या प्रमाणावर घसरतात व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. कधीकधी कांद्याचे दर इतके घसरतात की शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत नेण्याचा खर्च देखील निघणे कठीण जाते व खिशातून पैसे टाकावे लागतात.
साधारणपणे ही परिस्थिती कांद्याच्या बाबतीत कायम दिसून येते. उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च देखील न निघाल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढतो. या परिस्थितीला जास्त करून केंद्र सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. चार ते पाच वर्षातून एकदा कांद्याला बऱ्यापैकी दर मिळतात परंतु त्यानंतर मात्र दरवर्षी कांदा शेतकऱ्यांना रडवतोच ही परिस्थिती दिसून येते.
या अनुषंगाने जर आपण विचार केला तर कांदा असा कमी भावात म्हणजेच फुकट सारख्या स्थितीमध्ये विकण्यापेक्षा तुम्ही कांद्यावर व्यवस्थित प्रक्रिया करून जर कांद्याच्या पावडर बनवण्याचा व्यवसाय केला तर तुम्ही नक्कीच या व्यवसायातून लाखो रुपये कमवू शकतात. कारण कांद्याच्या पावडरला बाजारपेठेमध्ये खूप मोठी मागणी आहे आणि येणाऱ्या काळात ही मागणी अशीच वाढत राहणार हे मात्र निश्चित आहे. पुढे आपण लेखांमध्ये या व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत.
कांदा पावडर बनवण्याचा व्यवसाय
कांद्याचा विचार केला तर एका बाजूला कांद्याला दर मिळत नाही व कधीकधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मात्र कांद्याला मोठी मागणी दिसून येते. याच संधीचा फायदा घेऊन जर तुम्ही कांदा पावडरचा व्यवसाय केला तर लाखो रुपये नफा या माध्यमातून मिळवू शकतात.
हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर जेव्हा कांद्याचे भाव कमी असतात तेव्हा यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून जर हा व्यवसाय सुरू केला तर खूप फायद्याचा ठरू शकतो. तसेच इतर अनेक उद्योगांमध्ये देखील कांद्याला खूप जास्त मागणी असते व ती पूर्ण करण्याकरिता कांद्याच्या पेस्ट पासून कांद्याची पावडर किंवा कुरकुरीत तळलेला कांदा लागतो.
कांद्याचे निर्जलीकरण अर्थात यातून पाणी काढून टाकले तर कांदा सडत नाही व खूप दिवस टिकतो व अशा कांद्याला किंमत देखील चांगली मिळते. जर आपण कांदा पावडरचा विचार केला तर सध्या रेडी टू फूड इंडस्ट्री मध्ये पिझ्झा किंवा सॅलड किंवा रेडी टू मेक पोहे,
उपमा यासारखे खाद्यपदार्थांचा सध्या खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेंड आहे. या दृष्टिकोनातून कांद्याची पावडर देखील रेडी टू इट करिता वापरली जाऊ शकते. भारतापेक्षा इतर देशांमध्ये कांद्याच्या पावडरला खूप मोठी मागणी आहे. भाज्यांची चव वाढवण्या सोबतच ते तर काही सॅलडमध्ये देखील कांद्याची पावडर वापरल? जाते.
कांद्याची पूड किंवा पावडर बनवण्याची प्रक्रिया
कांद्याची पूड बनवण्याकरिता प्रथम कांदा व्यवस्थित सोलून स्वच्छ करावा लागतो व त्याचे नंतर तुकडे करावे लागतात. मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यायचे असेल तर ते सौर ऊर्जावर चालणारे जे काही सनड्रायर असतात त्यामध्ये किंवा इलेक्ट्रिक पॉवर ड्रायरमध्ये सुकवून घ्यावे. त्यामुळे कांद्यामधील सगळं पाणी निघून जाते.
अशाप्रकारे ओलावा पूर्णपणे कमी झाल्यानंतर कांदा जास्त काळ खराब होत नाही. असा निर्जलीत कांदा तुम्ही एअर टाईट पॅकिंग मध्ये त्याची विक्री करू शकतात. युरोप तसेच अमेरिकेसारख्या देशांमध्ये या प्रकारच्या उत्पादनाला खूप मागणी आहे. डीहायड्रेशन केलेला कांदा ग्राइंडर मध्ये बारीक करून त्याची पावडर तयार करू शकता व ही पावडर शंभर ग्राम ते 250 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये व्यवस्थित पॅक करून त्याची विक्री करू शकतात. ही पावडर विक्री करता तुम्ही हॉटेल किंवा फुड चेन रेस्टॉरंट यांच्याशी करार देखील करू शकतात व तुमची विक्री वाढवू शकता.
कांदा पावडर तयार करणाऱ्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य आणि भांडवल
कांदा पावडर व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला एकूण सहाशे चौरस फूट जागेची गरज भासते. ही जागा तुम्ही कच्चा माल ठेवण्यासाठी तसेच डीहायड्रेटर मशीन आणि ग्राइंडर ठेवण्यासाठी व तिसरा भाग तयार कांदा पावडर ठेवण्यासाठी वापरू शकतात. लागणाऱ्या गुंतवणुकीचा विचार केला तर यंत्रसामुग्री करिता तीन ते चार लाख रुपये इतकी गुंतवणूक गरजेची आहे
व कच्चा माला करिता एक लाख व खेळते भांडवलासाठी एक ते दीड लाख रुपये यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे साधारणपणे सहा लाख रुपयांच्या आसपास तुम्हाला भांडवल या व्यवसायासाठी लागते. दुसरा म्हणजे या व्यवसायाकरिता तुम्ही खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून देखील आर्थिक मदत मिळवू शकतात.