Bank FD Rule:- मुदत ठेव योजना या विविध बँकांच्या माध्यमातून राबवल्या जातात व यालाच आपण फिक्स डिपॉझिट किंवा एफडी योजना असं देखील म्हणतो. बँकांच्या मुदत ठेव योजना या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या व परताव्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांकडून मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते.
बँकांच्या माध्यमातून अनेक विविध प्रकारच्या मुदत ठेव योजना राबवल्या जातात व यामध्ये मिळणारा व्याजदर हा मुदत ठेवीच्या कालावधीनुसार वेगवेगळा असतो. परंतु मध्येच जर तुम्हाला काही आर्थिक गरज उद्भवली तर तुम्ही एफडी तिच्या मुदतीपूर्वी देखील मोडू शकतात व तुमची आर्थिक गरज भागवू शकता.
परंतु अशाप्रकारे जर तुम्ही कालावधी पूर्ण होण्याआधीच एफडी तोडली तर मात्र तुम्हाला काही प्रकारचे तोटे सहन करावे लागतात. यामध्ये बँकेच्या माध्यमातून तुम्हाला दंड देखील भरावा लागतो व सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला कमी व्याजदर मिळतो. यामध्ये तुम्हाला बँकेकडून एक टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो व हा दंड तुमच्या जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर आकारला जातो.
मुदत संपण्यापूर्वीच एफडी मोडल्यामुळे होणारे तोटे
बँकेमध्ये मुदत ठेवताना ज्या कालावधीची निवड केली असेल व त्या अगोदरच तुम्ही एफडी मोडली तर तुम्हाला जे काही व्याजदर ठरवलेला असेल त्या ऐवजी कार्ड दराने व्याज दिले जाते.
कार्ड व्याजदर म्हणजे ज्या कालावधीत तुम्ही एफडी मोडली त्या कालावधीकरिता एफडीवर बँकेकडून जे व्याज दिले जात असेल तेवढेच व्याज तुम्हाला मिळते. एफडी खाते उघडताना तुम्हाला जो काही व्याजदर ठरवलेला असतो त्यानुसार तुम्हाला व्याज मिळत नाही.
पाच वर्षाची एफडी एका वर्षात मोडली तर काय नुकसान होते?
समजा तुम्ही पाच वर्षाच्या कालावधी करिता एक लाख रुपयांची एफडी केली आहे व त्यावर तुम्हाला बँकेकडून सात टक्के व्याज निश्चित करण्यात आले आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही जर पाच वर्षाची मुदत ठेव एका वर्षात मोडली तर तुम्हाला एका वर्षासाठी बँकेने निश्चित केलेले कार्ड रेटवर व्याज मिळेल.म्हणजेच ते 6% पर्यंत असेल.
त्यासोबतच तुम्हाला एक टक्के दंड देखील भरावा लागेल व ज्यामुळे तुमचा प्रभावी व्याजदर 5% पर्यंत कमी होईल. जर तुम्ही पाच वर्ष मुदतीपर्यंत एफडी ठेवली असती तर सात टक्के व्याज तुम्हाला मिळाले असते.
म्हणजेच तुम्हाला एक लाखावर सात हजार रुपये नफा मिळाला असता.परंतु तुम्ही प्रीमॅच्युवर पैसे काढल्यामुळे तुम्हाला पाच हजार रुपये व्याज मिळेल व त्यामुळे तुमचे दोन हजार रुपयांचे नुकसान होईल.
अशी समस्या येऊ नये म्हणून काय करावे?
आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला एफडी मोडावी लागू नये याकरिता तुम्ही एकाच फिक्स डिपॉझिट मध्ये मोठी रक्कम ठेवण्या ऐवजी रकमेचे विभाजन करून अनेक छोट्या छोट्या मुदत ठेव योजनांमध्ये पैसे गुंतवावेत.
त्यामुळे तुम्हाला जर पैशांची गरज भासली तर तुम्ही फक्त काही एफडी तोडून तुमची गरज पूर्ण करू शकतात आणि उरलेल्या एफडीवर तुमचे व्याज सुरक्षित पद्धतीने तुम्हाला मिळत राहील.