Business Idea:- व्यवसाय म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व मोठ्या जागेमध्ये सुरू केलेला व्यवसाय नव्हे. व्यवसाय अगदी घरातून आणि काही हजाराची गुंतवणूक करून देखील करता येऊ शकतो. जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर कमीत कमी जागेत आणि कमीत कमी भांडवलात उत्तम नफा मिळवून देणारे अनेक व्यवसाय आहेत.
विशेष करून बाजारपेठेमध्ये कायम मागणी असणाऱ्या व्यवसायांचा विचार केला तर यामध्ये कमी गुंतवणुकीतील व्यवसायांची उत्पादने जास्त प्रमाणात विकली जातात. काही काही व्यवसाय अगदी काही हजार रुपयांचे यंत्रसामग्री खरेदी करून तुम्हाला सुरू करता येतात. अगदी याच पद्धतीचा एक व्यवसाय आपण या लेखात बघणार असून पस्तीस हजार रुपये किमतीचे एक यंत्र घेऊन तुम्ही प्रत्येक महिन्याला या व्यवसायातून 30 ते 40 हजार रुपये आरामात कमवू शकतात.
स्वयंचलित मशीनच्या साह्याने पापड बनवण्याचा व्यवसाय
पापड बनवण्याचा व्यवसाय हा तसा खूप जुना व्यवसाय असून अनेक महिला गृह उद्योग म्हणून या व्यवसायाची निवड करतात. पापड उद्योगांमध्ये अनेक नवीन मशीन आल्यामुळे आता तरुण देखील हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करू शकतात. या यंत्रांमध्ये अगदी लहान यंत्र देखील खूप मोठे काम करते.
उदाहरणच घ्यायचे झाले तर एक मोठी मशीन दोन तासांमध्ये एक हजार पापड तयार करते तर एक लहान मशीन दोन तासात दोनशे पापड बनवते. जर तुम्ही पापड उद्योगांमध्ये स्वतःचा ब्रँड निर्माण केला तर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो व ब्रँड निर्माण केल्यामुळे एमएसएमई अंतर्गत तुम्हाला बिनव्याजी कर्जच नाही तर अनुदान देखील मिळते.
पापड बनवण्याचा व्यवसाय हा महिलावर्ग खूप उत्तम पद्धतीने करू शकतात. पापडाची मागणी बाजारात नेहमीच असते व दर्जेदार पापड जर असला तर ग्राहक किमतीकडे लक्ष न देता गुणवत्ता आणि चव पाहतात व पापड खरेदी करतात. बाजारपेठेत कायम मागणी असणारा हा व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायाची निवड करणे खूप गरजेचे आहे.
या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक
पापड बनवण्याच्या व्यवसायामध्ये साधारणपणे पापड बनवण्याचे यंत्र, कच्चामाल, मार्केटिंग तसेच सेटअप साहित्य इत्यादीवर तुमचा खर्च अवलंबून असतो. यामध्ये जर आपण एकंदरीत भांडवल पाहिले तर मशीन करिता तुम्हाला पंधरा ते पन्नास हजार रुपये पर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते. तसेच पापड बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चामालाकरिता 5000 ते 15000 किंवा मोठा उद्योग असेल तर त्यापेक्षा जास्त गुंतवणूक कच्चामालावर करावी लागते.
काही सेटअप साहित्य खरेदी करण्याकरता तुम्हाला दहा ते वीस हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. यामध्ये मसाला बॉक्स तसेच चेंबर, डेस्क तसेच फर्निचर, विजेचे कनेक्शन आणि इतर साहित्याचा यामध्ये समावेश होतो. तसेच मार्केटिंग ही खूप महत्त्वाची असल्याने मार्केटिंग वर खर्च करणे गरजेचे असते व याकरिता तुम्ही बॅनर, पॅम्प्लेट, सोशल साइट्स वर ऍड वगैरे इत्यादीवर दोन ते पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो. सुरुवातीला जर अगदी छोट्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय सुरू केला तर कमीत कमी गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करता येऊ शकतो व नंतर व्यवस्थित नियोजन करून हळूहळू यामध्ये तुम्ही वाढ करू शकता व चांगला नफा मिळवू शकतात.