आर्थिक

Business Success Story: दूध विक्री करणाऱ्या व्यक्तीने उभारली 28 हजार 997 कोटी रुपयांची बंधन बँक! वाचा चंद्रशेखर घोष यांची यशोगाथा

Published by
Ajay Patil

Business Success Story:- व्यक्तीकडे पैसा असो किंवा नसो परंतु त्याचे ध्येय मात्र मोठे असले पाहिजे. जर व्यक्तीचे ध्येय मोठे असेल तर व्यक्ती परिस्थितीशी झगडत व अडचणींमधून मार्ग काढून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. तसेच हातपाय धरून न बसता प्रयत्न करणे खूप गरजेचे असते.

प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे प्रयत्न केल्याने कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. फक्त आपल्याला आपली इच्छा किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी, कितीही अडचणी आल्या तरी खंबीरपणे त्या अडचणींवर मात करत ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची उर्मी आपल्यात असणे खूप गरजेचे असते.

हे गुण व्यक्तीमध्ये असतील तर यश आपल्याला मिळतेच मिळते. अगदी याच पद्धतीने जर आपण बंधन बँकेचे संस्थापक आणि सीईओ चंद्रशेखर घोष यांची यशोगाथा पाहिली तर काहीशी अशीच आहे. एकेकाळी एक एक रुपयासाठी झगडणाऱ्या या व्यक्तीने मोठ्या कष्टाने आज भारतातील  प्रसिद्ध आणि मोठे बँक उभारली असून ती यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवली आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 बंधन बँकेचे संस्थापक आणि सीईओ चंद्रशेखर घोष यांची यशोगाथा

बंधन बँकेचे संस्थापक आणि सीईओ चंद्रशेखर घोष यांनी आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना केला व एक एक रुपयांकरिता त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट उपसले. पैसे मिळावे याकरिता घोष यांनी घरोघरी जाऊन दूध विक्री देखील केली. त्यामध्ये अनेक अडचणींचा सामना केला व गरिबीचे चटके सहन केले.

लहानपणापासून गरिबी ही त्यांच्या पाचवीलाच पूजलेली होती. त्यांच्या कुटुंबाची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर वडिलांचा मिठाई विक्रीचे एक छोटेसे दुकान होते व त्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु आर्थिक अडचणी काही पाठ सोडायला तयार नव्हत्या.

याकरिता त्यांनी कुटुंबाला आर्थिक दृष्टिकोनातून हातभार लागावा म्हणून घरोघरी दूध विक्री केली. अशा प्रकारच्या अडचणींमधून मार्ग काढत त्यांनी बारावीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर ढाका विद्यापीठातून त्यांनी सांख्यिकी या विषयांमध्ये 1978 यावर्षी पदवी संपादन केली.

शिक्षणाचा आणि स्वतःचा खर्च करता यावा याकरिता त्यांना शिकवण्या देखील घ्याव्या लागल्या. कसेबसे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांना इंटरनॅशनल डेव्हलपमेंट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन या ठिकाणी नोकरी मिळाली. हे एक एनजीओ होते व ती महिलांना आर्थिक दृष्टिकोनातून मदत करत होती.

ज्याप्रमाणे स्वयंसहायता बचत गट काम करतात त्याप्रमाणे या संस्थेचे काम होते. यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली व अशाच पद्धतीचे भारतामध्ये काहीतरी काम करावे असे ठरवून त्यांनी नोकरीला 1997 मध्ये राम राम ठोकला.

 1998 पासून केली खऱ्या अर्थाने सुरुवात

1997 मध्ये नोकरी सोडल्यानंतर 1998 मध्ये त्यांनी व्हिलेज वेल्फेअर नावाची सोसायटी सुरू केली. त्यानंतर 2001 मध्ये बंधन नावाने महिलांना कर्ज देण्याकरिता मायक्रो फायनान्स कंपनीची सुरुवात केली. याकरिता दोन लाख रुपये त्यांनी उसने घेतले व बंधन नावाने एक संस्था सुरू केली.

या सगळ्या प्रयत्नातून 2002 मध्ये त्यांना सीडबीकडून वीस लाख रुपये कर्ज मिळाले व इथूनच खऱ्या अर्थाने बंधन बँकेची सुरुवात झाली. या वीस लाख मधून त्यांनी 1100 महिलांना 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्जाचे वाटप केले. त्यानंतर हळूहळू वाटचाल करत असताना 2009 मध्ये बंधन बँकेला रिझर्व बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून नोंदणीकृत करण्यात आले

व बँकेच्या माध्यमातून घोष यांनी 80 लाख महिलांचे आयुष्यात बदल घडवून आणला. 2013 मध्ये त्यांनी रिझर्व बॅंकेकडे खाजगी बँकेकरिता अर्ज दाखल केला व 2015 मध्ये त्यांना बँकिंग परवाना मिळाला व अशाप्रकारे बंधन बँक अस्तित्वात आली. आज बंधन बँकेचे एकूण बाजारातील कॅपिटल 28 हजार 997 कोटी रुपये इतके आहे.

अशाप्रकारे चंद्रशेखर घोष यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की, व्यक्तीच्या जीवनात किती जरी अडचणी असल्या परंतु ध्येय पक्के असेल व ते ध्येय पूर्ण करण्यासाठी असलेली इच्छाशक्ती व प्रयत्न करण्याची हिंमत असेल तर व्यक्ती कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो.

Ajay Patil