7th pay commission : शिक्षक, शिक्षकेतरांची दिवाळी गोड होण्यासाठी सातव्या वेतन आयोगातील थकीत रकमा व सर्व थकीत बिले दिवाळीपूर्वी मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्षक परिषदेचे शहरजिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर व वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले.
यावेळी प्रांतसदस्य प्रा. सुनिल सुसरे, नाशिक विभाग प्रमुख शरद दळवी, कार्यवाह प्रा. शिवाजी घाडगे, कोषाध्यक्ष प्रसाद सामलेटी, प्रा. जयंत गायकवाड, पारखे सर, सुदेश छाजलाने, साजिद पठाण, बबन शिंदे आदी उपस्थित होते.
शासनाच्या आदेशानुसार अंशदायी पेन्शन योजनेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील फरक रकमेची रोखीने व सन २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह खात्यात दरवर्षी एक प्रमाणे पाच टप्प्यात वितरित करावे असे शासनाचे आदेश आहेत.
आजपर्यंत तीन ते चार टप्पे जमा होणे आवश्यक होते. परंतु आजतागायात फक्त एक किंवा काहींना दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे. तसेच २००५ पूर्वीचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांचा एकच व काहीचा दुसरा हप्ता भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा झालेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.