नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या व निकाल देखील जाहीर झाला. निकालानुसार बघितले तर देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असून नऊ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. जर आपण ही लोकसभेची निवडणूक पहिली तर ती अनेक कारणानी खूप रंगतदार आणि वेगळी ठरली.
महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड देत मोठा धक्का दिला. महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टीचे अनेक मात्तबर खासदार या निवडणुकीत पराभूत झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीतून खासदारांची निवड केली जाते हे आपल्याला माहित आहे व या दृष्टिकोनातून जर पाहिले तर बऱ्याचदा आपल्या मनामध्ये येत असेल की खासदाराला पगार किती मिळत असेल किंवा कोणत्या सुविधा मिळत असतील? तर याविषयीची माहिती या लेखात आपण बघणार आहोत.
खासदारांना किती मिळतो पगार?
जर आपण भारतातील खासदारांचा महिन्याचा पगार पाहिला तर तो साधारणपणे एक लाख रुपये इतका आहे खासदारांचा पगार हा प्रत्येक पाच वर्षांनी त्यांच्या दैनंदिन भत्त्याच्या रूपामध्ये वाढत असतो. एकूण पगारांमध्ये संसद सदस्यांचे वेतन तसेच भत्ते आणि पेन्शन( सुधारणा) कायदा 2010 नुसार दरमहा पन्नास हजार रुपये मूळ वेतन यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे व संसदेमध्ये अधिवेशन काळात व इतर कामकाजासाठी उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकाला दैनिक दोन हजार रुपये इतका भत्ता मिळत असतो व यासोबतच प्रत्येक खासदाराला प्रत्येक महिन्याला 70 हजार रुपये मतदार संघ भत्ता देखील मिळतो.
तसेच ऑफिस खर्चासाठी प्रत्येक महिन्याला साठ हजार रुपये मिळतात. या 60000 मध्ये सहायकांसाठी 40,000 तर इतर खर्चासाठी 20000 हजार रुपयांचा समावेश असतो. तसेच जनतेचे कर्तव्य पार पाडण्यासाठी खासदारांना प्रवास करावा लागतो व या दृष्टिकोनातून त्यांना प्रवास भत्ता देखील देण्यात येतो. विशेष म्हणजे खासदारांना ज्या मोफत निवासी सुविधा मिळतात त्या ते भाड्याने देखील देऊ शकतात व तसा अधिकार त्यांना आहे. याशिवाय भारतातील अंदमान निकोबार बेट व लडाख येथील खासदारांना काही विशेष भत्ते दिले जातात.
खासदारांना मिळणाऱ्या इतर सुविधा
खासदारांना एक विशिष्ट पास मिळतो व त्यामुळे ते मोफत रेल्वे प्रवास करू शकता. प्रवास करताना ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसी किंवा एक्सिक्यूटिव्ह क्लासमध्ये प्रवास ते करू शकतात. जर एखादा खासदार सरकारी कामाच्या निमित्ताने परदेशामध्ये गेला तरी त्यांना सरकारी भत्ता देण्याचा नियम असतो.
याशिवाय त्यांना उपचाराच्या सुविधा देखील मिळतात व खासदारांवर कोणत्याही सरकारी रुग्णालयात किंवा कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याचा खर्च सरकार करत असते व इतकेच नाही तर त्यांच्या सुरक्षारक्षकांचा खर्च देखील सरकारच्या माध्यमातून करण्यात येतो.
माजी खासदारांना मिळणाऱ्या सुविधा आणि पेन्शन
विद्यमान खासदारांशिवाय माजी खासदारांना देखील बऱ्याच सुविधा मिळतात. माजी खासदार हे कोणत्याही एका व्यक्तीला सोबत घेऊन सेकंड एसीमध्ये मोफत प्रवास करू शकतात व माजी खासदाराची इच्छा असेल की फर्स्ट एसीमध्ये एकट्याने प्रवास करायचा आहे तर ते करू शकतात. तसेच राज्यसभा व लोकसभेच्या माजी खासदारांना प्रति महिना 25 हजार रुपये मिळतात. तसेच पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी असेल तर अशा माजी खासदारांच्या ज्येष्ठतेचा सन्मान ठेवत प्रत्येक वर्षाला पंधराशे रुपये दर महिन्याचे त्यांना वेगळे दिले जातात. त्यामुळे जे खासदार जास्त टर्म राहिलेले आहेत त्यांना पेन्शन जास्त मिळते.
खासदारांना टॅक्स भरावा लागतो का?
लोकसभा किंवा राज्यसभेचे खासदार तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या सगळ्यांना नियमानुसार त्यांच्या मूळ पगाराचाच टॅक्स भरावा लागतो. पगारा व्यतिरिक्त त्यांना जे काही इतर भत्त्यांचा लाभ मिळतो त्यावर कुठल्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. खासदारांचा महिन्याचा पगार एक लाख रुपये आहे व वर्षाचे बारा लाख रुपये होतात व त्यांना एकूण या 12 लाख रुपयांवरच कर भरावा लागतो. मात्र मिळणाऱ्या भत्त्यांवर कर भरावा लागत नाही.