आर्थिक

बँकेचे कर्ज तुमच्याकडून थकीत झाले तर बँक मालमत्ता जप्त करते का? कशी आहे जप्तीची प्रक्रिया? मालमत्तेचा लिलाव केव्हा होतो?

Published by
Ajay Patil

Rule Of Property Auction:- सध्या जर आपण बघितले तर विविध गोष्टींसाठी व्यक्ती कर्ज घेत असते किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी देखील कर्ज घेतले जाते. आपल्याला माहित आहे की घर किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर बरेच जण होमलोन घेतात व त्या माध्यमातून घराची खरेदी करतात.

यासोबतच वाहन कर्ज म्हणजेच कार खरेदीसाठी देखील लोन घेतले जाते व या सगळ्या प्रकारच्या कर्जामध्ये मात्र आपल्याला काही मालमत्ता तारण ठेवणे गरजेचे असते व मालमत्ता गहाण किंवा तारण ठेवल्यानंतरच बँके कडून कर्ज दिले जाते. बरेच व्यक्ती नियमितपणे कर्जाची परतफेड करतात.

परंतु मध्येच काही समस्या निर्माण झाल्यामुळे कर्जाचे हप्ते भरणे कठीण व्हायला लागते व हफ्ते थकीत होतात. अशावेळी आपण जी काही मालमत्ता कर्ज घेताना बँकेला तारण दिलेली असते त्या मालमत्तेचा लिलाव करून बँक कर्जाची रक्कम वसूल करत असते व बँकेला त्याचा अधिकार आहे. परंतु यासाठीची काही प्रक्रिया व नियम असतात व ते बँकेला पाळावे लागतात.

कर्जाचे हप्ते थकीत झाले तर केव्हा केली जाते मालमत्ता जप्त?
समजा तुम्ही एखाद्या कर्जासाठी घर किंवा इतर मालमत्ता तारण दिलेली आहे व काही कारणास्तव कर्जाचे हप्ते भरण्यात तुम्ही अपयशी ठरल्यास बँक कर्ज वसूल करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात करते. त्यामध्ये समजा तुमचा कर्जाचा एक हप्ता भरला गेला नसेल तर बँक तुमची मालमत्ता जप्त करत नाही.

यामध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला विविध प्रकारच्या संधी देण्यात येतात आणि मालमत्ता लिलाव हा एक शेवटचा पर्याय असतो. समजा एखाद्या व्यक्तीने जर सलग दोन महिने कर्जाचा हप्ता भरला नाही तर बँक त्याला आठवण करून देण्यासाठी रिमाइंडर पाठवते. म्हणजेच बँक कर्जदाराला हप्ता भरण्याची एक आठवण करून देते.

त्यानंतर देखील हप्ता भरला नाही व तिसरा हप्ता देखील थकला तर बँकेच्या माध्यमातून मात्र या वेळेस कायदेशीर नोटीस पाठवली जाते. तरी देखील हप्ता भरला नाही तर बँक संबंधित मालमत्ता एनपीए म्हणून घोषित करते आणि ज्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे त्याला डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाते. यानंतर देखील मालमत्तेचा लिलाव होत नाही.

मालमत्ता लिलावाची प्रक्रिया केव्हा सुरू केली जाते?
लिलावाच्या तीन श्रेणी असतात व यामध्ये सब स्टॅंडर्ड मालमत्ता, संशयास्पद मालमत्ता आणि लॉस असेट या होय. यामध्ये जर हप्ते भरले नाही तर सगळ्यात अगोदर कर्ज खाते एक वर्षाकरिता निकृष्ट मालमत्ता खात्याच्या श्रेणीमध्ये राहते व त्यानंतर ते संशयास्पद मालमत्ता श्रेणीमध्ये जाते.

त्यानंतर कर्ज वसुलीची जेव्हा कोणत्याही प्रकारची आशा राहत नाही तेव्हा ती मालमत्ता लॉस असेल म्हणजेच तोटा संपत्ती म्हणून मानली जाते व त्यानंतरच मात्र लिलाव केला जातो.

लिलावाकरिता बँकेला सार्वजनिक सूचना जारी करावी लागते. मालमत्तेची विक्री करण्यापूर्वी तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहेत त्या बँक किंवा वित्तीय संस्थेला मालमत्तेची अचूक किंमत सांगणारी एक नोटीस देखील जारी करावी लागते व त्यामध्ये राखीव किंमत आणि लिलावाची तारीख तसेच वेळ व संबंधित अटी शर्ती नमूद करणे देखील गरजेचे असते.

समजा मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे व त्यामध्ये जर मालमत्तेची किंमत कमी ठेवण्यात आली असेल तर तुम्हाला लिलाव प्रक्रियेलाच आव्हान देता येऊ शकते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे कर्ज न भरल्यामुळे जर मालमत्तेचा लिलाव झाला तर संबंधित मालमत्तेचा लिलाव करून बँक त्यांचे कर्ज वसूल केल्यानंतर जी रक्कम उरते ती अतिरिक्त रक्कम कर्जदाराला परत द्यावी लागते.

Ajay Patil