GST Rate On Popcorn:- पॉपकॉर्न म्हटले म्हणजे साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला खायला आवडते. साधारणपणे प्रवास करताना किंवा सिनेमागृहामध्ये जेव्हा आपण एखादा चित्रपट पाहिला जातो तेव्हा मोठ्या प्रमाणावर पॉपकॉर्न खाल्ले जाते व त्यावेळी पॉपकॉर्न खाणाऱ्यांची संख्या देखील मोठी असल्याचे आपल्याला दिसून येते.
अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत पॉपकॉर्न सगळ्यांना खायला आवडते. परंतु आता सगळ्यांचे आवडते हेच पॉपकॉर्न खाण्यासाठी मात्र आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. म्हणजेच एकंदरीत आता पॉपकॉर्न खाणे देखील महाग होणार आहे व यामागील प्रमुख कारण आहे ते म्हणजे पॉपकॉर्न वर लावण्यात आलेला जीएसटी कर होय.
त्या अनुषंगाने या लेखामध्ये आपण माहिती घेणार आहोत की कोणत्या प्रकारच्या पॉपकॉर्न खरेदी करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील व किती जीएसटी यावर आता लावण्यात आला आहे?
आता पॉपकॉर्न खाणे झाले महाग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजस्थान येथील जैसलमेर या ठिकाणी जीएसटी परिषदेच्या सुरू असलेल्या 55 व्या बैठकीमध्ये पॉपकॉर्नवरील जीएसटी कर आकारणीबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली व या बैठकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पॉपकॉर्न वर तीन प्रकारे जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व त्यामुळे आता साहजिकच पॉपकॉर्नच्या किमतीत वाढ होणार आहे.
आपल्याला माहित आहे की, सध्या जे काही पॉपकॉर्न विकले जाते त्याचे स्वरूप आणि प्रकार देखील वेगवेगळे आहेत व या वेगवेगळ्या श्रेणी किंवा प्रकारानुसार आता वेगवेगळ्या पद्धतीचा जीएसटी यावर आकारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये आता पॉपकॉर्न खुले विकले जात आहे की त्याची पॅकिंग विकली जात आहे यावर देखील ते आता स्वस्त किंवा महाग ठरणार आहे.
पॉपकॉर्नच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार असेल वेगवेगळा जीएसटी
यामध्ये वेगवेगळ्या पॉपकॉर्नवर वेगवेगळ्या प्रकारचा जीएसटी आकारण्यात येणार आहे. समजा पॉपकॉर्नमध्ये मीठ आणि मसाला असेल आणि ते पॅक केलेले असेल, परंतु त्यावर लेबल लावले नसेल व लेबल न लावताच त्याची विक्री केली जात असेल तर त्यावर पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
परंतु हेच पॉपकॉर्न लेबल लावून विक्री होत असेल तर त्यावर मात्र आता 12% जीएसटी लागणार आहे. तसेच कॅरॅमल पॉपकॉर्नमध्ये साखर मिसळलेली असते व यामुळे या प्रकारच्या पॉपकॉर्नला साखरेची मिठाई या प्रकारामध्ये मोडले जाणार असून त्यावर आता 18% जीएसटी आकारला जाणार आहे.
म्हणजेच तुम्ही जर शंभर रुपयांचे कॅरॅमल पॉपकॉर्न खरेदी केले तर त्यावर साधारणपणे तुम्हाला 118 रुपये मोजावे लागणार आहेत. पॉपकॉर्नच्या प्रकारानुसार जर बघितले तर समजा तुम्ही मीठ आणि मसाला असलेले विना लेबलचे शंभर रुपयाचे पॉपकॉर्न घेतले तर त्यावर तुम्हाला पाच टक्के जीएसटी भरावा लागेल म्हणजेच तुम्हाला आता शंभर रुपयासाठी 105 रुपये द्यावे लागणार आहेत.
हेच पॉपकॉर्न जर लेबलसह विकले जात असेल तर तुम्हाला त्यावर 12% जीएसटी द्यावा लागणार आहे व हेच पॉपकॉर्न तुम्हाला शंभर ऐवजी 112 रुपयांना विकत घ्यावे लागणार आहे.