EPFO Update:- ज्याप्रमाणे बरेच कर्मचारी सरकारी क्षेत्रामध्ये काम करतात अगदी त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. परंतु खाजगी क्षेत्राचे कर्मचारी काम करतात त्यांना अजून देखील ईपीएफओ च्या पेन्शन योजनेबद्दल पुरेशी माहिती नाही.
खाजगी क्षेत्रातील कर्मचारी ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या ईपीएफ मधील योगदानातील बहुतांश कर्मचारी पेन्शन स्कीम म्हणजेच ईपीएस मध्ये जमा करण्यात येतो. कारण आपल्याला माहित आहे की बऱ्याच कर्मचाऱ्यांचा पगार कमी असतो व त्यांना मोठी रक्कम उभी करता येत नाही व साहजिकच त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना पुढील उदरनिर्वाह करिता फार मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे शक्य होत नाही.
त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना दर महिना उत्पन्नाचे काहीतरी साधन मिळावे याकरिता कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएस 95 सुरू करण्यात आलेली आहे. जर आपण या योजनेचे नियम पाहिले तर त्यानुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अधिक महागाई भत्त्याच्या 12% योगदान इपीएफ मध्ये जमा करण्यात येते.
कर्मचाऱ्यांच्या पगारातून वजा होणारी 12 टक्क्यांची रक्कम त्यांच्या पीएफ खात्यात जमा होते तर कंपनी किंवा संस्थेकडून करण्यात येणारे योगदान पूर्णपणे ईपीएफ मध्ये न जाता ते दोन भागात विभागले जाते. म्हणजे यातील 3.67% रक्कम पीएफ खात्यामध्ये तर उरलेली 8.33% रक्कम पेन्शन खात्यात जमा होते.
काय आहे नेमकी ईपीएस योजना?
ईपीएफ खातेधारकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने इपीएस योजना सुरू केली असून या माध्यमातून असंख्य कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळतो. व कर्मचारी वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त होतो त्यानंतर त्याला दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद या योजनेत आहे. परंतु या योजनेचा लाभ फक्त अशा कर्मचाऱ्यांनाच मिळतो ज्यांची नोकरी किमान दहा वर्षांसाठी आहे किंवा सतत दहा वर्ष ईपीएफ खात्यात योगदान दिल्यानंतरच पेन्शन मिळते.
कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची रक्कम कशी निश्चित केली जाते?
कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम कशी निश्चित केली जाते हा आपल्या समोर एक मोठा प्रश्न आहे. परंतु याकरिता ईपीएफचा एक फॉर्मुला आहे व याचा वापर करून कर्मचाऱ्यांची पेन्शनची रक्कम निश्चित करता येते. जर कोणत्याही कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ हा वीस वर्षाचा असेल व त्यामध्ये दोन वर्षे बोनस म्हणून जोडले जातात. तसेच वर्षाची गणना ही राऊंड फिगर आकड्यांमध्ये करण्यात येते.
उदाहरणार्थ जर कर्मचाऱ्यांची पेन्शन योग्य सेवा दहा वर्ष सहा महिने असेल तर राऊंड फिगर आकडा अकरा वर्षांचा पकडला जातो. हा फार्मूला जर उदाहरणाने समजून घ्यायचा असेल तर समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा एक वर्षाचा सरासरी पगार म्हणजे बेसिक अधिक डीए पंधरा हजार रुपये आणि पेन्शन योग्य नोकरीचा कालावधी 21 वर्ष असेल तर त्याला 15000 गुणिले 21 वर्ष नोकरीचा कालावधी भागिले 70 केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला साडेचार हजार रुपये पेन्शन मिळणार.
ईपीएस योजनेची सुरुवात 1995 पासून करण्यात आली व सध्या या योजनेनुसार कमीत कमी हजार तर जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये पेन्शन दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे जर पीएफ सदस्याचा किंवा पीएफ धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूनंतर पत्नीला व पत्नीही नसेल तर मुलांना हा पेन्शनचा फायदा मिळतो.तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील हयात असलेल्या मुलांना मासिक बाल निवृत्ती वेतनाचा लाभ देखील मिळत राहतो.