Farmer Success Story:- शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर अलीकडच्या काळात होत असून यामुळे आता शेतकऱ्यांना कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे उत्पन्न घेता येणे शक्य झाले आहे. एवढेच नाही तर पारंपारिक पिकांऐवजी शेतकरी आता भाजीपाला तसेच फळबागांकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून अगदी एकर दीड एकर मध्ये देखील पाच एकर इतके उत्पादन घेताना आपल्याला दिसून येत आहेत.
तसेच आताचे तरुण मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळत आहेत व तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करत असल्याने शेतीला आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक स्वरूप आलेले आहे. युवा शेतकरी आता पिकेच नाही तर शेतीला जोडधंदा म्हणून देखील वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करताना आपल्याला दिसून येत आहेत.
या पद्धतीने जर आपण हरियाणा राज्यातील कर्नाल जिल्ह्यातील एका तरुणाचा विचार केला तर या तरुण शेतकऱ्याने खाजगी नोकरी सोडून दीड एकर शेती करायला सुरुवात केली आणि आज लाखो रुपयांचे उत्पन्न काढण्यात तो यशस्वी झाला आहेच परंतु तो इतर लोकांना देखील रोजगार देत आहे.
मशरूम शेतीतून साधली आर्थिक प्रगती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हरियाणा राज्यातील कर्नाल जिल्ह्यात राहणाऱ्या बलविंद्र सिंग या तरुण शेतकऱ्याने खाजगी कंपनीमध्ये असलेली नोकरी सोडली व मशरूमची शेती करायला सुरुवात केली. बलविंद्र यांनी योग्य दीड एकर मधून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्याची किमया साधली आहे.
यामध्ये तो मशरूमची लागवड करत असून हा व्यवसाय वाढत असताना त्याने इतर लोकांना देखील यामध्ये रोजगार दिला आहे.आजकालचे बरेच तरुण उदरनिर्वाहासाठी गावापासून एखाद्या शहरात खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करतात अशा तरुणांकरिता बलविंद्र हा एक आदर्श व प्रेरणास्थान बनला आहे.
अशा पद्धतीने केली मशरूम शेतीची सुरुवात
बलविंदर सिंग एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करत होते. परंतु नोकरी करत असताना आणखी काहीतरी वेगळे काम करावे अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये होती व त्या दृष्टिकोनातून त्यांनी कामाचा शोध देखील सुरू केला. तेव्हा त्यांना मशरूम शेती विषयी माहिती मिळाली व त्यांनी मशरूम शेती करण्याचा निर्णय घेतला.
भविष्यातील रोजगार आणि आर्थिक फायदे लक्षात घेता त्यांनी मशरूम लागवड करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता त्यांनी शेडची उभारणी केली व कमीत कमी खर्चामध्ये शेड उभे करण्यासाठी प्रयत्न केला. नंतर मात्र पक्के शेड उभे केले.
या पक्के शेड उभारणीसाठी त्यांना शासनाकडून 40 टक्के अनुदान देखील मिळाले. अशाप्रकारे त्यांनी मशरूम व्यवसायाला सुरुवात केली. आज या व्यवसायामध्ये त्यांच्यासोबत वीस लोक काम करत असून योग्य पद्धतीने मशरूम लागवड केल्यास खर्चाच्या दुप्पट नफा मिळतो असे देखील बलविंदर सिंग यांनी सांगितले.
मशरूम शेतीसाठी किती येतो खर्च?
त्यांनी दीड एकर वर मशरूमची लागवड केली असून याकरिता एका उत्पादनासाठी दीड लाख रुपये खर्च येतो. परंतु एका खोलीतून तीन ते साडेतीन लाख रुपये किमतीचे मशरूम निघते. नफ्याचे गणित किंवा उत्पन्नाचे गणित बाजारभावावर अवलंबून असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
जेव्हा सुरुवातीला मशरूम व्यवसायात ते आले तेव्हा त्यांना मार्केटमध्ये मशरूम विकण्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. परंतु हळूहळू यामध्ये त्यांनी जम बसवला व आज जम्मू-काश्मीरला देखील ते मशरूम पाठवतात
व त्या ठिकाणी त्यांना चांगला दर मिळतो. मशरूमच्या लागवडीनंतर साधारणपणे एक महिन्यांनी उत्पादन सुरू होते. आज मशरूम लागवड करून जवळपास सहा वर्षे त्यांना पूर्ण झालेली आहेत.