Farming Business Idea:- पिकांपासून भरपूर उत्पादनाकरिता विविध प्रकारचे व्यवस्थापन करायला लागते व यामध्ये खत व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे खतांच्या माध्यमातून पिकांना आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा पुरवठा केला जातो. यासोबतच कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होऊ नये याकरिता रासायनिक कीटकनाशकांची फवारणी देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात.
परंतु रासायनिक खते व कीटकनाशकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आलेच आहे परंतु विषारी अशा कीटकनाशकांचा वापरामुळे मानवी आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. या सगळ्या अनुषंगाने आता सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत असल्यामुळे सेंद्रिय शेतीकडे देखील आता अनेक शेतकरी वळू लागले आहेत व शासनाच्या माध्यमातून देखील सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांना पर्याय म्हणून सेंद्रिय खतांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत सेंद्रिय खतांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार असून या सेंद्रिय खत निर्मितीचा व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण सेंद्रिय खतांचा व्यवसाय कसा करावा व त्याकरिता लागणारे आवश्यक गोष्टी इत्यादी बद्दल माहिती घेणार आहोत.
सेंद्रिय खतांच्या व्यवसायाकरिता किती लागेल पैसा?
या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला जास्त पैशांची गरज लागू शकते. जर तुमच्याकडे पैशांची तजवीज नसेल तर तुम्ही याकरिता तुम्ही कर्ज घेऊन देखील पैशांची उभारणी करू शकतात. छोट्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला सेंद्रिय खत निर्मिती व्यवसाय उभारायचा असेल तर तुम्हाला एक ते पाच लाख रुपयांपर्यंतचे भांडवल लागू शकते.
तसेच तुमच्याकडे जिथे जमीन उपलब्ध आहे त्या जमिनीवर तुम्ही सेंद्रिय खत तयार करू शकता व यानंतर तुम्हाला ऑटो क्लेव्ह, बायो फर्मेंटर, आरो प्लांट तसेच कंपोस्ट शिलाई मशीन, बायो रिऍक्टर तसेच फ्रिजर कन्वेयर्स यासारखे यंत्रसामग्री देखील घ्यावी लागेल. तसेच तुम्हाला खत निर्मितीचा परवाना आणि जीएसटी रजिस्ट्रेशन सारख्या बाबी देखील पूर्ण कराव्या लागतात.
कोणता कच्चामाल वापराल?
सेंद्रिय खत निर्मिती व्यवसायाकरिता कच्चामाल म्हणून तुम्ही शेणखत, लेंडी खत तसेच कोंबडी खताचा वापर करू शकतात तसेच शेतातील पिकांचे अवशेष आणि रॉक फॉस्फेट हा कच्चामाल म्हणून तुम्हाला लागेल.
सेंद्रिय खतांपासून तुम्हाला किती उत्पन्न मिळेल?
सेंद्रिय खत व्यवसायातून तुम्हाला जो काही नफा मिळेल तो व्यवसायाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. या व्यवसायामध्ये आपल्याला एकूण खर्चाच्या 20 ते 21 टक्क्यांपर्यंत नफा मिळणे शक्य आहे. याचाच अर्थ जर तुम्ही पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला या माध्यमातून सहा लाख रुपये पर्यंत कमाई होईल व निव्वळ नफाचा विचार केला तर तो साधारणपणे एक लाख रुपये इतका असेल. म्हणजेच तुम्ही जसा जसा तुमचा व्यवसायाची वाढ करत जाल तस तसा तुमच्या निव्वळ नफ्यात वाढ होत राहील हे मात्र निश्चित.