Ghadi Detergent Success Story:- ‘पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे’ ही जी काही टॅग लाईन आहे ही आता प्रत्येकाच्या तोंडावर किंवा एखाद्या म्हणी सारखी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला माहित आहेच की ही जी काही टॅग लाईन आहे ही घडी डिटर्जंट पावडर आणि घडी डिटर्जंट सोपची आहे.
साधारणपणे दशकापूर्वी घडीने या टॅगलाईन सह डिटर्जंट च्या जगामध्ये प्रवेश केला होता व आज प्रत्येक घरात विशेषतः उत्तर भारतात हा ब्रँड खूप प्रसिद्ध आहे. अगोदर या कंपनीने लोकांना डिटर्जंट वापरण्याचे आवाहन केले व नंतर विश्वास जिंकला जो आज देखील तसाच कायम आहे. हे उत्पादन जर पाहिले तर हे रोहित सर्फक्तन्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच आरएसपीएलचे आहे.
उत्तर प्रदेश मधील कानपूर येथील रहिवासी असलेले मुरलीधर ग्यानचंदानी आणि बिमल ग्यानचंदानी यांनी या कंपनीचा पाया घातला आणि खूप कष्ट तसेच संयमाने कंपनीची वाटचाल सुरू ठेवली व आज जगातील आघाड्याच्या कंपन्यांमध्ये या कंपनीचे गणना होते. नेमकी या कंपनीची सुरुवात कशी झाली व इतके यश कसे मिळवले याबद्दलची माहिती घेऊ.
घडी डिटर्जंट पावडर आणि सोपची यशोगाथा
अगदी सुरुवातीचा विचार केला तर घडी डिटर्जंट कोणत्याही कंपनीचे उत्पादन नव्हते. अगदी छोट्याशा खोलीत तयार केलेले डिटर्जंट होते. साधारणपणे 1987 मध्ये कानपूरच्या शास्त्रीनगर मध्ये राहणाऱ्या दोन तरुणांनी फाजल जंग फायर स्टेशन जवळ एका छोटासा डिटर्जंट कारखाना उघडला व त्याचे नाव ठेवले श्री महादेव सोप इंडस्ट्री.
यामध्ये साबण बनवून हे दोघेही पायी किंवा सायकलवरून घरोघर किंवा परिसरात आणि दुकानांमध्ये साबणाची डिलिव्हरी पोहोचवत असत. अशाप्रकारे या व्यवसायातून दोघांना थोडाफार पैसा मिळू लागला. परंतु हे काम जास्त वेळ टिकले नाही. परंतु दोघांनी देखील संयम ठेवत वाटचाल चालू ठेवली. हळूहळू कानपूरच्या जास्तीत जास्त घरांमध्ये घडी साबण वापरला जाऊ लागला. त्या कालावधीमध्ये या क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्यांचा दबदबा होता.
अशा परिस्थितीत यांचा व्यवसाय फक्त कानपूर शहरापुरता मर्यादित होता. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी विक्रेत्यांना कमिशन द्यायला देखील सुरुवात केली व 2005 मध्ये या कंपनीचे नाव बदलून आरएसपीएल करण्यात आले. हळूहळू कानपूर व्यतिरिक्त उत्तर प्रदेश राज्यातील इतर शहरांमध्ये देखील घडी डिटर्जंट पोहोचू लागले. मोठ्या कंपन्यांचे डिटर्जंट पावडर वापरले जात होते व अशा परिस्थितीत मुरली बाबूंना एक नवीन मार्केटिंगची कल्पना सुचली व ती त्यांनी चांगल्या पद्धतीने अमलात आणली.
याकरिता त्यांनी आले इस्तेमाल करे फिर विश्वास करे हे टॅग लाईन आणली व ती खूप आकर्षक होती. त्यानंतर लोकांनी हे उत्पादन वापरायला सुरुवात केली व लोकांना प्रचंड प्रमाणात त्यांचे उत्पादन देखील आवडायला लागले. अशाप्रकारे घडी डिटर्जन्ट लोकांचा विश्वास मिळवला. त्यांच्या उत्पादनाला देशातील एकूण मागणी पैकी 18% मागणी उत्तर प्रदेश राज्यातून येते हे त्यांनी ओळखले.
त्यामुळे त्यांनी आधी उत्तर प्रदेश राज्यावर संपूर्ण फोकस केला आणि नंतर मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि पंजाब मध्ये व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे डिटर्जंट क्षेत्रातील बाकीच्या कंपन्या जे करत नाहीत ते आपल्याला करावं लागेल हे दोघांना समजले.
बहुतांशी वाशिंग पावडर या निळ्या किंवा पिवळ्या रंगाच्या होत्या. यामध्ये त्यांनी बदल करत पांढऱ्या रंगाची वॉशिंग पावडर बाजारामध्ये आणण्याचा निर्णय घेतला पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या टॅगलाईन चा आधार घेत व इतर कंपन्यांच्या तुलनेत दुकानदारांना अधिक कमिशन ऑफर करत त्यांनी व्यवसाय वाढवायला सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे इतर कंपन्यांच्या डिटर्जंट पावडरच्या तुलनेमध्ये त्यांनी त्यांच्या उत्पादनाची किंमत देखील कमीत कमी ठेवली.
यशासाठी वापरल्या या युक्त्या
या कंपनीने दोनशे ते तीनशे किलोमीटरच्या टप्प्यामध्ये एक छोटासा युनिट डेपो उभा करायला सुरुवात केली. त्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील कमी झाला व उत्पादने लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहोचायला मदत मिळाली. आज छोट्याशा खोलीतून सुरुवात झालेली ही कंपनी आज संपूर्ण देशात विस्तारली आहे.
आजमीतिला विचार केला तर निव्वळ वाशिंग पावडर किंवा साबणच नाही तर हॅन्ड वॉश, रूम फ्रेशनर तसेच टॉयलेट क्लीनर, नमस्ते इंडिया सॅनिटरी नॅपकिन, रेडचीप फुटवेअर आणि रिअल इस्टेट पर्यंत या कंपनीची मजल गेलेली आहे. जर आज कंपनीचे व्हॅल्युएशन अर्थात मूल्यांकन पाहिले तर ते 12,000 कोटी रुपयांच्या घरात आहे.
एका छोट्या खोलीतून सुरू केलेल्या कंपनीचे मालक मुरलीधर ग्यानचंदानी आणि विमल ग्यानचंदानी हे उत्तर प्रदेश राज्यातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. दोघांचे नेटवर्थ पाहिले तर वीस हजार कोटींपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे मुरलीधर ग्यानचंदानी भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये 149 व्या क्रमांकावर आहेत.
अशा पद्धतीने मेहनत आणि कष्टाच्या जोरावर छोट्याशा खोलीत सुरू झालेली घडी डिटर्जंट आज यशाच्या शिखरावर आहे.