7th Pay Commission : नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा फटका बसणार आहे. खरंतर एका वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो.नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात झाला असला तरी देखील ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली. दरम्यान आता नवीन वर्षात पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला होता. म्हणजेच त्यावेळी महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला होता. मात्र जुलै 2024 पासून महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढला. आणि आता जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता कितीने वाढू शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील एलआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता कितीने वाढणार हे क्लिअर होणार आहे.आतापर्यंत एआयसीपीआयची जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील आकडेवारी समोर आली आहे. याकडेवारीनुसार महागाई भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढणार आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांची आकडेवारी येणे बाकी आहे मात्र ही आकडेवारी आली तरी देखील यामध्ये फारसा फरक पडणार नाही. म्हणजेच जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळी महागाई भत्ता किमान चार टक्क्यांनी वाढायला हवा अशी अपेक्षा होती. मात्र सध्याचे चित्र पाहता जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 56 टक्क्यांवर पोहोचणार आहे.
ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू होणार असली तरी देखील याबाबतचा निर्णय हा सालाबादाप्रमाणे मार्च महिन्यातच होण्याची शक्यता आहे. दरवर्षी मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होतो. त्यानुसार मार्च 2025 मध्ये महागाई भत्ता 56% होईल असे म्हटले जात आहे. पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे.