आर्थिक

GST Registration: व्यवसाय सुरू करायचा तर जीएसटी नोंदणी आहे महत्त्वाची! वाचा नोंदणीसाठी किती लागतो पैसा आणि कशी आहे नोंदणीची प्रक्रिया?

Published by
Ajay Patil

GST Registration:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो. परंतु व्यवसाय सुरू करण्या अगोदर आपल्याला गुंतवणुकीसाठी पैसा आवश्यक असतो व पैशांशिवाय आपल्याला काही परवाने आणि काही प्रकारच्या नोंदणी करणे देखील महत्त्वाचे असते.

कायदेशीर दृष्ट्या अडचण निर्माण होऊ नये म्हणून व्यवसायासाठी या नोंदणी महत्त्वाच्या असतात. यातीलच एक महत्त्वाची नोंदणी म्हणजे जीएसटी नोंदणी ही होय. यानुसार व्यवसाय करायचा असेल तर जीएसटी नोंदणी करणे महत्त्वाचे ठरते.

यामध्ये तुम्हाला जर व्यवसाय सुरू करून जीएसटी नोंदणी करायची आहे तर ते तुम्हाला व्यवसाय कोणता सुरू करायचा आहे यावर अवलंबून असते. साधारणपणे सुरुवातीला जीएसटी नोंदणीची गरज पडत नाही व यामध्ये सरकारने काही नियम शिथील केले आहेत.

परंतु जर तुम्ही वीस लाख रुपयांच्या आत काम करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सूट मिळू शकते. परंतु यापेक्षा जास्त व्यवहार असेल तर तुम्हाला जीएसटी नोंदणी करणे गरजेचे आहे.

 जीएसटी नोंदणीसाठीची ऑनलाईन प्रक्रिया

तुम्हाला जर जीएसटी नोंदणी करायची असेल तर तुम्हाला कुठे जाण्याची गरज नसून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया करू शकतात. जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जीएसटी नोंदणीसाठी अर्ज करतात तेव्हा तुम्हाला एक टीआरएन क्रमांक मिळतो.

त्यानंतर तुम्हाला तुमचा जीएसटी क्रमांक कुणाला दिला गेला आहे हे तुम्हाला कळेल. त्यानंतर तुम्हाला मंजुरी मिळेल. साधारणपणे जर तुमची कागदपत्रे योग्य असतील तर तुमची जीएसटी नोंदणी सात ते दहा दिवसांमध्ये पूर्ण होते. परंतु कागदपत्रे किंवा इतर बाबतीत काही समस्या उद्भवली तर पंधरा ते वीस दिवस लागू शकतात.

 जीएसटी नोंदणीसाठी कुठली कागदपत्रे लागतात?

जीएसटी  नोंदणी करण्यासाठी व्यवसायाच्या मालकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो, कंपनीचे पॅन कार्ड, ओळखीचा पुरावा( आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स), ओपीसी,

एलएलपी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांकरिता असोसिएशनचे प्रमाणपत्र, बँकेचा तपशील जसे की बँक स्टेटमेंट, बँकेचे पासबुक किंवा रद्द केलेला चेक, भागीदारी फार्म म्हणजेच भागीदारीत व्यवसाय असेल तर भागीदारी डिड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.

 जीएसटी नोंदणीसाठी किती शुल्क लागते?

तुम्ही जर कुठल्याही सीएच्या माध्यमातून जीएसटी नोंदणी केली तर त्याकरिता तुम्हाला साधारणपणे 2500 ते 5000 रुपयांमध्ये करून दिली जाते. तसेच खाजगी लिमिटेड कंपनी करिता ही फी दहा हजार रुपयापर्यंत जाऊ शकते.

 जीएसटी नोंदणीची गरज का?

आपल्याला माहित आहे की अगोदर जे सर्व कर आकारले जात होते ते आता एकाच जीएसटीच्या कक्षेत आणले गेलेले आहेत. तुमचा वार्षिक टर्नओव्हर 40 लाख रुपये असेल किंवा काही प्रकरणांमध्ये वीस लाखापेक्षा जास्त असेल तर जीएसटी कायद्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही करदाते आहात.

यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात कर भरणे गरजेचे राहील. त्यामुळे हा कर भरण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागते. जर तुम्ही जीएसटी नोंदणी न करता व्यवसाय सुरू केला तर तो कायद्याने गुन्हा असून याबाबत जर तुम्ही आढळून आला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

Ajay Patil