आर्थिक

महायुती सरकारच्या धोरणाने गुजरातचा वस्त्रोद्योग वळला महाराष्ट्राकडे! नवापूर एमआयडीसीत 3 महिन्यात उभारले 130 कारखाने; वाचा या मागील कारणे?

Published by
Ajay Patil

Textile Industries In Maharashtra :- गुजरात राज्य म्हटले म्हणजे औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून एक प्रगत असे राज्य समजले जाते व या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्त्रोद्योगाचे जाळे पसरल्याचे आपल्याला दिसून येते.

गुजरात राज्यामधील सुरत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्त्रोद्योग इंडस्ट्री असून मोठ्या प्रमाणावर कापड निर्मिती या ठिकाणी होते. त्या अनुषंगाने जर आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये भिवंडी  आणि मालेगाव या ठिकाणी हातमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून ही दोन ठिकाणे सोडली तर महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योग फारसा दिसून येत नाही.

परंतु आता गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील नवापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यापासून गुजरात मधील 130 कारखाने उभे राहिले असून येणाऱ्या काही दिवसात या वस्त्रोद्योग कारखान्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

 गुजरात राज्यातून महाराष्ट्रामध्ये वस्त्रोद्योग येण्याची प्रमुख कारणे

जर आपण कापसाचे उत्पादन बघितले तर देशातील एकूण उत्पादनापैकी 30 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. तसेच मुंबई बंदरातून कापसाची आयात निर्यात देखील मोठ्या प्रमाणावर होते.

त्यामुळे मुंबईशी जवळ असलेल्या राज्यातील इतर भागात वस्त्रोद्योग चांगल्या स्थितीमध्ये होता. परंतु कालांतराने वीजदरांमध्ये झालेली वाढ या उद्योगांसाठी मारक ठरली व त्यामुळे वस्त्रोद्योगाने काढता पाय घेतला.

परंतु मागच्या वर्षी राज्य सरकारने वस्त्रोद्योग धोरण आणताना ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून महावितरण कडून स्वस्त दरामध्ये वस्त्रोद्योगासाठी वीज देऊ केली व त्याचा फायदा आता होताना दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये सध्या गुजरात येथे विजेचे दर जास्त असल्यामुळे तिकडचे उद्योग आता महाराष्ट्रात येऊ लागल्याचे चित्र आहे.

 राज्य सरकारने मागच्या वर्षी आणले होते वस्त्रोद्योग धोरण

महाराष्ट्र सरकारने मागच्या वर्षी वस्त्रोद्योग धोरणांतर्गत कारखान्यांसाठी कमी दाब व उच्च दाब मिळून विविध प्रकारच्या 11 श्रेणीतील वस्त्र उद्योग क्षेत्रातील कारखान्यांना सरासरी तीन रुपये अनुदानाची घोषणा केली.

या घोषणेनंतर काही महिन्यातच गुजरात राज्यातील छोटे उद्योग महाराष्ट्रात येऊ लागले. नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या नवापूर या ठिकाणी धागा तयार करण्यासोबतच वस्त्रोद्योगातील इतर प्रकारचे  उद्योग मिळून जवळपास 130 कारखाने तीन महिन्यात उभारले गेले आहेत. या कारखान्यांना महावितरणच्या माध्यमातून कमी व अनुदानित दरात वीज दिली जात आहे.

त्या तुलनेत मात्र गुजरात राज्याने अलीकडच्या कालावधीत वस्त्रोद्योग धोरण घोषित केले व त्यामध्ये त्यांनी केवळ नवीन युनिट स्थापन करणाऱ्या कारखान्यांनाच वीज दरात सवलत दिली. जुन्या कारखान्यांना मात्र साडेआठ रुपये प्रतियुनिट दराने वीज घ्यावी लागणार आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील आणि गुजरात राज्यातील वीजदराची तुलना केली तर महाराष्ट्रातील वीजदर कमीत कमी तीन रुपये प्रति युनिट कमी आहेत. तसेच अनुदानामुळे महाराष्ट्रातील वीजदर जास्त स्वस्त असून गुजरात राज्यातील अनेक वस्त्र उद्योगांनी आता नवीन वीज जोडणी संदर्भात विचारणा सुरू केल्याची माहिती देखील महावितरणच्या माध्यमातून देण्यात आली.

तसेच दिवाळीनंतर सुरत येथील कमीत कमी 25 मोठे कारखाने नवापूर किंवा अमरावती या ठिकाणी येतील अशी चिन्हे आहेत.या सगळ्या कारखान्यांना आता अनुदानित दराने वीज देण्याची तयारी देखील महावितरणच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Ajay Patil