Health Insurance Tips:- संपूर्ण आयुष्यामध्ये जेव्हा आपण नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून पैसा कमावत असतो तेव्हा त्या पैशांची बचत करून त्या बचतीची गुंतवणूक चांगल्या पर्यायामध्ये करणे खूप गरजेचे असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक ही आयुष्याच्या उतारवयामध्ये तसेच मुलांचे शिक्षण तसेच लग्न इत्यादी करिता खूप कामात येते व त्यामुळे पैशांची चिंता आपल्याला राहत नाही.
दुसरी महत्त्वाची बाब येते ती म्हणजे आपल्या स्वतःचे आरोग्य आणि कुटुंबाचे आरोग्य होय. जीवन जगत असताना जर एखाद्या वेळी अचानकपणे मोठी आरोग्याची समस्या उद्भवली तर प्रचंड प्रमाणात हॉस्पिटलवर खर्च करावा लागतो.
कधीकधी हॉस्पिटलचा खर्च किंवा आरोग्यावर होणारा खर्च इतका मोठा असतो की त्यामुळे पूर्ण आयुष्याची आर्थिक घडी देखील विस्कटू शकते.
अशा परिस्थितीत आरोग्य विमा हा एक उत्तम असा पर्याय असून योग्य आर्थिक नियोजन करून जर आरोग्य विमा खरेदी केला तर तुम्ही आयुष्यात येणाऱ्या हॉस्पिटल खर्चाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकतात. परंतु आरोग्य विमा घेताना तो कमी वयात जर घेतला तर खूप मोठे फायदे मिळतात. याविषयीचीच माहिती आपण या लेखात थोडक्यात बघू.
तरुणपणी किंवा कमी वयात आरोग्य विमा खरेदी करण्याचे फायदे
जेव्हा वय पन्नाशीच्या पुढे जाते तेव्हा आरोग्य विमा खरेदी करण्यापेक्षा तो कमी वयात खरेदी केला तर खूप फायद्याचे ठरते. कमी वयात जर तुम्ही आरोग्य विमा खरेदी केला तर तुम्हाला त्यासाठी भरावा लागणार हप्ता हा कमी भरावा लागतो.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला क्लेम बोनसचे फायदे देखील मिळतात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे कमी वयात जर तुम्ही आरोग्य विमा घेत असाल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या विमा पॉलिसीचा पर्याय उपलब्ध असतो व त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजन बघून किंवा आर्थिक स्त्रोत बघून आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकतात.साधारणपणे कमी वयात आरोग्य विमा घेण्याचे फायदे बघितले तर ते….
1- प्रीमियमची रक्कम– कमी वयामध्ये जर तुम्ही आरोग्य विमा खरेदी केला तर प्रीमियमची रक्कम देखील तुम्हाला कमीत कमी भरावी लागते. उदाहरणच घ्यायचे तर 25 व्या वर्षी जर तुम्ही पाच लाख रुपये कव्हर असलेला आरोग्य विमा खरेदी केला व याकरिता तुम्हाला दहा हजार रुपये खर्च करावा लागला
व तोच विमा तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी खरेदी केला तर तुम्हाला वीस हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. साठ वर्षाच्या पुढील व्यक्ती असेल तर याकरिताचे रक्कम दुप्पट तिप्पट जास्त भरावी लागते. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे जास्त वय असलेल्या व्यक्तींना जर आरोग्य विमा घ्यायचा असेल तर प्रीमियमची रक्कम जास्त असते.
2- आरोग्याची तपासणी– कमीत कमी वयामध्ये जर विमा खरेदी केला तर त्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची आरोग्य तपासणी करावी लागत नाही.
कारण अनेक विमा कंपन्या जेव्हा पॉलिसी जारी करतात तेव्हा चाळीस ते पन्नास वर्षांपुढील व्यक्तींची आरोग्य तपासणी करतात. या तपासणी मध्ये जर काही आजार आढळून आला तर पॉलिसीमध्ये समावेश केला जात नाही किंवा प्रीमियम जास्त भरावा लागतो.
3- आजारांचा समावेश– साधारणपणे तरुणांना कोणत्याही प्रकारचे आजार नसतात. त्यामुळे पॉलिसी खरेदी केल्यानंतर जर एखादा आजार झाला तर संपूर्ण खर्च त्या पॉलिसी मधून कव्हर करता येतो.
याउलट जास्त वयामध्ये अनेक आजारांनी शरीराला ग्रासलेले असू शकते व अशावेळी विमा कंपन्या खरेदी करत असलेल्या पॉलिसीमध्ये त्या आजारांचा समावेश करत नाही. त्यामुळे पॉलिसीपासून जेवढा फायदा मिळायला पाहिजे तेवढा तुम्हाला मिळत नाही व हॉस्पिटलचा खर्च तुम्हाला स्वतः करावा लागतो.
याकरिता तुम्ही कमीत कमी वयामध्ये जर आरोग्य विमा खरेदी केला तर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायद्यात राहू शकतात.