आर्थिक

Bank Locker Rule: एखाद्या व्यक्तीने बँक लॉकरमध्ये सोने-चांदी ठेवले आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर….. काय आहेत बँक लॉकरचे नियम?

Published by
Ajay Patil

Bank Locker Rule:- आपण आयुष्यामध्ये व्यवसाय किंवा नोकरी करून राबराब राबतो आणि त्यातून कष्टाने पैसे कमवत असतो व अशा कष्टातून कमावलेल्या पैशांच्या माध्यमातून आपण अनेक सोने-चांदीसारख्या मौल्यवान गोष्टींमध्ये गुंतवणूक करून त्यांची खरेदी करत असतो. त्यामुळे आपण कष्टाने कमावलेल्या अशा मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता ही खूप महत्त्वाचे असते.

असे अनेक प्रकारचे महत्त्वाचे कागदपत्रे देखील असतात. याकरिता सोने चांदी किंवा पैसे तसेच महत्त्वाचे कागदपत्रे घरात ठेवणे काही दृष्टिकोनातून जोखमीचे ठरू शकते. बऱ्याचदा जर एखाद्या वेळेस घरात चोरी झाली व अशा प्रकारे सोने-चांदीचे दागिने किंवा पैसे चोरीला गेले तर मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते.

त्यामुळे आजकालच्या कालावधीमध्ये बरेच व्यक्ती हे अशा मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवण्याला पसंती देतात. आपल्याला माहित असेलच की बँकेच्या माध्यमातून अशी लॉकरची सुविधा देण्याबद्दल आपल्याकडून काही शुल्क आकारले जाते व हे शुल्क देऊन तुम्ही कुठल्याही प्रकारची वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवू शकतात.

यामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून काही मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आलेले आहेत व त्यातून बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची सुरक्षितता अधोरेखित होते.

 बँक लॉकरमध्ये सोनेचांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवणे सुरक्षित आहे का?

बँक लॉकरमध्ये तुम्ही ज्याही काही मौल्यवान वस्तू किंवा कागदपत्र ठेवाल ते पूर्णपणे सुरक्षित असतात व याची संपूर्ण जबाबदारी देखील बँकेची असते. जर याबाबत आपण रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नियम बघितले तर त्यानुसार बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या एखाद्या वस्तूची चोरी झाली तर संबंधित बँकेला संपूर्ण नुकसान भरपाई संबंधित व्यक्तीला द्यावी लागते.

जर आपण या नुकसान भरपाईचे स्वरूप पाहिले तर ते बँकेने लॉकरकरिता वर्षाला घेतलेल्या भाड्याचे शंभर पट अधिक रक्कम भरपाईच्या स्वरूपात द्यावी लागते. तसेच लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची चोरी किंवा आग व इतर कारणांमुळे नुकसान होणार नाही याची देखील खबरदारी घ्यावी लागते.

परंतु यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब अशी आहे की, एखाद्या वेळी जर भूकंप किंवा पूर सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे लॉकर मधील ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंचे नुकसान झाले तर मात्र यात बँकेची जबाबदारी नसते.

 बँकेच्या लॉकरमध्ये रोख रक्कम ठेवणे योग्य आहे का?

बँकेच्या लॉकरमध्ये तुम्ही रोख रक्कम  ठेवणे तसे पाहायला गेले तर योग्य होत नाही. कारण लॉकर मध्ये जर तुम्ही रोख रक्कम ठेवली व या रकमेतील नोटांचे नुकसान झाले तर ही भरपाई तुम्हाला मिळत नाही. दुसरे म्हणजे लॉकरमध्ये ठेवलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजाचा लाभ देखील दिला जात नाही. तुम्हाला मात्र बँकेच्या लॉकरमध्ये रोख रक्कम ठेवता येऊ शकते.

परंतु यामध्ये ही पैशांची रक्कम तुमच्याकडे कुठून आली याबाबत जर तुम्ही कागदपत्रे सादर करू शकला नाहीत  तर यावर आयकर विभाग काही प्रश्न उपस्थित करू शकतो. त्यामुळे त्या ऐवजी जर तुम्ही बँकेच्या खात्यात रोख रक्कम ठेवली तर त्या रकमेवर तुम्हाला व्याज देखील मिळते व ती रक्कम सुरक्षित देखील राहते.

 एखाद्या व्यक्तीने बँक लॉकरमध्ये वस्तू ठेवल्या त्याचा मृत्यू झाला तर….

आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण बँकेमध्ये खाते उघडतो किंवा एफडी करतो तेव्हा आपल्याला त्यासाठी एक नॉमिनी निर्देशित करावा लागतो व त्याचप्रमाणे बँक लॉकरसाठी देखील नॉमिनी तुम्हाला नियुक्त करता येतो.

त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यू झाला तर बँक लॉकर वापरण्याचा व त्यातील वस्तूंचा अधिकार हा संपूर्ण नॉमिनीला दिला जातो. त्यामध्ये नॉमिनी बँक लॉकरची सुविधा वापरू शकतो अथवा तो बंद करू शकतो.

 जॉईंट लॉकर असल्यास

समजा एखाद्या व्यक्तीने दोन जण मिळून म्हणजेच पती किंवा पत्नी मिळून जर संयुक्त लॉकर घेतले असेल तर या दोघांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसरा व्यक्तीला त्या बँक लॉकरचा वापर करण्याची परवानगी मिळते.

दुसऱ्या व्यक्तीला आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात. परंतु जर बँक लॉकर करिता कुणीही नॉमिनी नसेल तर मात्र विशिष्ट अशी कायदेशीर प्रक्रिया पार करून व्यक्तीच्या वारसाला लॉकर विषयीचे सर्व हक्क दिले जातात.

Ajay Patil