प्रत्येकाचे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर असावे हे स्वप्न असते. परंतु सध्या जागा आणि घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य होत नाही व कित्येकांचे तर आयुष्यभर स्वप्न हे स्वप्नच राहते.
परंतु आता अनेक बँकांच्या माध्यमातून होमलोन सहजतेने दिले जाते व त्यामुळे अनेक जण होमलोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु होमलोन घेतले म्हणजे 15 ते 20 वर्षांपर्यंत आपल्याला त्याचा ईएमआय भरणे गरजेचे असते. यामुळे बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताण देखील येऊ शकतो.
तसेच मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे शासनाकडून परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात व यामध्ये म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून ज्या काही लॉटरी काढल्या जातात त्याचा खूप फायदा होतो.
याच पद्धतीने जर आपण म्हाडाचा विचार केला तर म्हाडाने नुकतीच मुंबईमध्ये 2030 घरांसाठी सोडत काढली आहे व यामध्ये मुंबईत राहणाऱ्या अनेकांना घर मिळण्यासाठी अर्ज करता येणे शक्य होणार आहे. यामध्ये उत्पन्न गटानुसार अर्ज करता येणार आहेत व तुमचा पगार तर 25 हजार रुपये असेल तर तुम्हाला देखील अत्यल्प उत्पन्न गटातून या लॉटरीत घराकरिता अर्ज करता येणार आहे.
म्हाडाच्या घरासाठी 25000 रुपये पगार असेल तर अत्यल्प गटातून करता येणार अर्ज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या माध्यमातून 2030 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे व यामध्ये पंचवीस हजार रुपये दरमहा पगार असलेल्या व्यक्तींना देखील अत्यल्प गटातून अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या माध्यमातून मुंबईतील प्राईम लोकेशन असलेल्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात घर विकत घेण्याची संधी निर्माण झाली आहे.
जर आपण म्हाडाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीनुसार बघितले तर या लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटाकरिता 359, अल्प उत्पन्न गटाकरिता 657, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 आणि उच्च उत्पन्न गटाकरिता 276 घरे उपलब्ध आहेत.
तुम्हाला असलेल्या पगारानुसार तुम्हाला या लॉटरीत होता येईल सहभागी
तुम्ही जर नोकरीला असाल व तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्या पगारानुसार, वार्षिक आर्थिक उत्पन्ननुसार घर घेऊ शकतात. म्हणजेच जर 25 ते 50 हजार मासिक पगार असेल तर असे व्यक्ती अत्यल्प व अल्प गटातून अर्ज करू शकतील. 50 ते 75 हजार एवढा पगार असेल तर ते अल्प व मध्यम गटात अर्ज करू शकतील.
75 हजारपेक्षा जास्त आणि एक लाख रुपये पर्यंत पगार असेल तर अशा व्यक्ति मध्यम ते उच्च उत्पन्न गटातून अर्ज करू शकतात. एक लाखापेक्षा जास्त पगार असलेल्या नोकरदारांना उच्च उत्पन्न गटातून अर्ज करता येणार आहे.
यावरून आपल्याला दिसून येते की तुम्हाला पगार किती आहे यावरून तुम्हाला कोणत्या गटातून अर्ज करायचा आहे हे तुम्ही ठरवू शकतात. नुकतीच म्हाडाच्या माध्यमातून ही 2030 घरांसाठीची लॉटरी जाहीर करण्यात आली असून 13 सप्टेंबरला या लॉटरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
म्हाडाची ही घरे मुंबईतील या भागात आहेत
म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या 2030 घरांच्या लॉटरीमध्ये मुंबई उपनगरातील अँटॉप हिल वडाळा, पहाडी गोरेगाव, कोपरी, पवई, कन्नमवार नगर- विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स- मालाड या ठिकाणी हे घरे उपलब्ध आहेत.
या लॉटरीसाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी सहा लाख उत्पन्नाचे मर्यादा आहे.तर अल्प उत्पन्न गटासाठी नऊ लाख, मध्यम उत्पन्न गटाकरिता 12 लाख रुपये तर उच्च उत्पन्न गटाकरिता 12 लाखापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे व असे उत्पन्ननिहाय गट करण्यात आलेले आहेत.
कसा करता येईल अर्ज?
ह्या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर म्हाडाच्या housing.mhada.gov.in किंवा mhada.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल अथवा Mobile App- Mhada Housing Lottery System वर जावे लागेल. संकेतस्थळावर जाऊन अगोदर अर्जदाराला स्वतःच्या नावाची नोंदणी करावी लागेल व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.