Investment Tips:- तुम्ही किती पैसे कमवतात याला महत्त्व नसून तुम्ही जे पैसे कमवतात त्यातून बचत किती करतात व त्या बचतीची गुंतवणूक कशा पद्धतीने करतात याला भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.
जर तुम्ही चांगल्या प्रकारच्या गुंतवणूक योजना मध्ये पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा कालांतराने मिळतो. गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि परतावा चांगला मिळण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गुंतवणूक पर्याय सध्या उपलब्ध आहेत.
यामध्ये अनेक सरकारी योजना खूप महत्त्वाच्या असून या योजनांमध्ये जर गुंतवणूक केली तर गुंतवणूक सुरक्षित राहते व त्यासोबत परतावा देखील चांगला मिळतो. एवढेच नाही तर या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने सरकारची हमी देखील राहते आणि तुम्हाला कर्ज सुविधा देखील मिळू शकते.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेचा विचार केला तर गुंतवणुकीसाठी ही एक चांगली योजना आहे. याच योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती या लेखात बघणार आहोत.
पीपीएफ योजनेमध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करावी लागते?
ही एक महत्त्वाचे सरकारी योजना असून या योजनेमध्ये तुम्ही वार्षिक कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतात. ही रक्कम तुम्ही हप्त्याने किंवा एक रकमी देखील यामध्ये गुंतवू शकतात व त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.
ईपीएफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिस मधील मुदत ठेव योजनेपेक्षा जास्त व्याजाचा लाभ मिळतो. सध्या या योजनेवर 7.1% व्याज मिळत आहे. तसेच या योजनेत चक्रवाढ व्याज मिळते. या व्याजाची मोजणी किंवा गणना वार्षिक आधारावर केली जाते. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये व्याज दिले जाते व दर तीन महिन्यांनी व्याजात सुधारणा किंवा त्या व्याजाचे पुनरावलोकन केले जाते.
या योजनेतील गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळतो
कर सवलतीच्या दृष्टिकोनातून ही एक चांगली योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला परतावा तर चांगला मिळतोच परंतु तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सुट देखील मिळते व याची कमाल मर्यादा दीड लाख रुपयापर्यंत आहे.
या योजनेत किती कालावधी करिता गुंतवणूक करावी लागते?
या योजनेमध्ये तुम्ही पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करणे गरजेचे असते. पंधरा वर्षानंतर तुम्हाला ही योजना चालू ठेवायची असेल तर तुम्ही पीपीएफ खाते दर पाच वर्षाकरिता वाढवू शकता. या मुदत वाढीसाठी चा अर्ज तुम्हाला मॅच्युरिटीच्या एक वर्ष आधी करणे गरजेचे असते.
आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढता येतात का?
या योजनेचा परिपक्वता कालावधी पंधरा वर्षाचा आहे. परंतु जर काही आपत्कालीन परिस्थिती आली तर तुम्ही तुमच्या जमा रकमेच्या 50% पर्यंत रक्कम काढू शकतात. फक्त यामध्ये तुमचे पीपीएफ खाते उघडून सहा वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. 6 वर्षानंतरच तुम्हाला पन्नास टक्के रक्कम काढता येणे शक्य आहे.
तसेच या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पीपीएफ योजनेचे खाते सुरू करण्याला तीन वर्ष झाले असतील तर तुम्ही त्यावर कर्ज देखील घेऊ शकता. खात्यामध्ये जमा रकमेच्या एकूण 25 टक्के रक्कम तुम्हाला कर्ज स्वरूपात मिळू शकते व यावर फक्त तुम्हाला दोन टक्के जास्त व्याज द्यावे लागते.
या योजनेसाठी खाते कुठे उघडाल?
तुम्ही या योजनेसाठीचे खाते पोस्ट ऑफिस आणि देशातील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये उघडू शकतात.कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडू शकतात. तुम्ही अगदी कमी वय असलेल्या मुलांचे नावे देखील या योजनेमध्ये खाते उघडू शकतात.
परंतु याकरता पालकांची आवश्यकता भासते. कारण यामध्ये मुलांच्या खात्यातून जो काही परतावा किंवा कमाई मिळते ती पालकांच्या उत्पन्नामध्ये जोडली जाते. समजा तुम्हाला पीपीएफ खाते बंद करायचे आहे तर त्यासाठी एक नियम आहे व तो म्हणजे तुम्ही खाते उघडल्यानंतर पाच वर्षापर्यंत ते बंद करू शकत नाहीत.
पाच वर्षे झाल्यानंतर मात्र काही विशिष्ट प्रकरणांमध्ये ते तुम्ही बंद करू शकतात. असे विशिष्ट प्रकरणांमध्ये जर पाहिले तर मुले किंवा पालकांना काही जीवघेणा आजार झाला किंवा खातेदाराला जीवघेणा आजार झाला तर वैद्यकीय कागदपत्रे दाखवणे आवश्यक असून त्यानंतर तुम्हाला खाते बंद करता येते. समजा जर खातेधारकाचा मृत्यू झाला तर मात्र हे खात्यात बंद होते.
खात्यात महिन्याच्या कोणत्या तारखेला पैसे जमा करावे लागतात?
जर तुम्ही पीपीएफ योजनेमध्ये पैसा जमा करत असाल तर ते तुम्हाला महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जमा करणे गरजेचे असते. तुम्हाला त्या संपूर्ण महिन्यांमध्ये मिळणाऱ्या व्याजाचा लाभ घेता येतो. जर तुम्ही महिन्याच्या सहा तारीख किंवा शेवटच्या तारखेपर्यंत पैसे जमा केले तर पुढील महिन्यापासून त्यावर व्याज जोडले जाते.
405 रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्ही करोडपती कसे होऊ शकतात?
यामध्ये जर तुम्ही दररोज फक्त 405 रुपयांचे गुंतवणूक केली तरी तुम्ही कोट्याधीश होऊ शकतात. तुम्ही जर दररोज या योजने चारशे पाच रुपयाची गुंतवणूक केली तर एका वर्षात तुमचे एक लाख 47 हजार ८५० रुपये साधारणपणे जमा होतात व यावर 7.1% व्याजदर पकडला तर तुम्ही पंचवीस वर्षात एक कोटी रुपये जमा करू शकतात.