Home Loan:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे आता सोपे झाले असून अनेक बँकांच्या माध्यमातून घर घेण्यासाठी होम लोन दिले जाते. हे होमलोन प्रामुख्याने पगारदार व्यक्ती आणि व्यावसायिक व्यक्तींना दिले जाते. वेगवेगळ्या बँकांकडून देण्यात येणारे होमलोनचे व्याजदर देखील वेगवेगळे असतात व अटी आणि शर्तीमध्ये देखील बदल असतो.
आताचे बरेच तरुण नोकरी लागली की सगळ्यात आधी स्वतःचे घर घ्यायचा विचार करतात. परंतु जर आपण कुठेही नोकरी करायला सुरुवात केली तर अगोदर पगार नक्कीच जास्त मिळत नाही. साधारणपणे वीस ते पंचवीस हजार रुपये मासिक पगारापासून सुरुवात होते. समजा तुम्हाला पंचवीस हजार रुपये पगार आहे
आणि एवढ्या पगारावर तुम्हाला घर घेण्यासाठी होमलोन घ्यायचे आहे तर ते तुम्हाला मिळू शकते का? आणि मिळालेच तर किती मिळेल? हे देखील पाहणे गरजेचे असते. या लेखामध्ये जर तुम्हाला महिन्याला 25 हजार रुपये पगार असेल तर तुम्हाला किती होम लोन मिळू शकते? त्याबद्दलची माहिती बघू.
होमलोनसाठी आवश्यक पात्रता
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला होम लोन मिळेल की नाही हे सर्वस्वी बँकांच्या पात्रतेच्या निकषांवर अवलंबून असते व यामध्ये तुम्ही खरे उतरणे गरजेचे असते. हे पात्रतेचे निकष बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. जसे की कर्जाचा कालावधी, महिन्याचा पगार किती आहे? तुमच्या चालू असणारे सध्याचे ईएमआय इत्यादी सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो.
यामध्ये पात्रता निकषात प्रामुख्याने पगारदार व्यक्तीचे वय 23 ते 62 वर्ष आणि स्वयंरोजगार करणारा व्यक्ती असेल तर त्याचे वय 25 ते 70 वर्षे असणे गरजेचे आहे.
तसेच गृहकर्जा करीता सिबिल स्कोर साडेसातशे असणे महत्त्वाचे आहे. तसेच जर स्वतःचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायातील पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यामध्ये पगारदार व्यक्ती साडेतीन कोटी आणि व्यापारी व्यक्ती पाच कोटीपर्यंत कर्ज घेऊ शकतो.
पंचवीस हजार रुपये पगार असेल तर किती मिळेल होमलोन?
यामध्ये जर बघितले तर तुमच्या हातात किती पगार मिळतो म्हणजेच तुमची टेक होम सॅलरी किती आहे हे प्रामुख्याने कर्ज देणारी कंपनी किंवा बँक ग्राह्य धरते. यामध्ये ग्रॅच्युईटी, पीएफ तसेच ईएसआयला वजा केले जाते. जर तुमची टेक होम सॅलरी म्हणजेच हातात पंचवीस हजार रुपये पगार मिळत आहे आणि 25 वर्षांसाठी तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर साधारणपणे 18.64 लाख रुपये कर्ज तुम्हाला मिळू शकते.
जर तुमची टेक होम सॅलरी 50 हजार रुपये असेल तर तुम्हाला 37.28 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकेल. म्हणजेच तुम्हाला जेवढी टेक होम सॅलरी जास्त असेल तेवढी कर्जाची पात्रता तुमची वाढते.
तसेच कर्ज मिळण्यामध्ये तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे व त्यासोबत तुमच्या वयाचा देखील यामध्ये बराच प्रभाव पडतो. कारण वित्तीय संस्थांना तुमच्या वयावरून अंदाज लावता येतो की तुम्ही किती कालावधीत किंवा किती वेळेत हे होम लोन फेडू शकतात.