Chicken Breed:- भारत हा कृषीप्रधान देश आहे व शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय शेतकरी पूर्वापार शेतीला जोडधंदा म्हणून खूप कुक्कुटपालन तसेच पशुपालन व शेळीपालना सारखे व्यवसाय करत आलेले आहेत. त्यामध्ये जर आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय बघितला तर कमी खर्चात जास्तीत जास्त पैसा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ओळखला जातो.
आता कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आल्याने अनेक सुशिक्षित तरुण आता या व्यवसायाकडे वळले आहेत व व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री व्यवसाय करू लागले. यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून बॉयलर कोंबडीचे संगोपन आणि दुसरा प्रकार म्हणजे अनेक शेतकरी आता देशी कोंबडी पालन देखील मोठ्या प्रमाणात करतात.
अगदी पाच ते दहा हजार पक्षांचे क्षमता असलेले पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांनी बांधले असून यामध्ये देशी कोंबडी पालन केले जाते. देशी कोंबडी पालन करण्याच्या अनुषंगाने पाहिलं तर अनेक कोंबड्यांच्या जाती आहेत व त्यातील काही जातींची निवड कुक्कुटपालन करता करणे हे आर्थिक उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरते.
त्यामुळे तुम्हाला देखील देशी कोंबडीपालन सुरू करायचे असेल तर या लेखामध्ये आपण अशाच एका देशी कोंबडीच्या जातीची माहिती घेणार आहोत जी कुक्कुटपालनामध्ये कमी खर्चात जास्त पैसा देऊ शकते.
झारसिम कोंबडीचे पालन ठरेल फायद्याचे
झारसिम ही देशी कोंबडीची जात असून झारखंड राज्यातील बिरसा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली आहे. या जातीच्या कोंबडीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही एका वर्षाला तब्बल 170 अंडी देण्यास सक्षम असून इतर देशी कोंबड्यांच्या तुलनेत बघितले तर ही कोंबडी जवळपास दुप्पट अंड्यांचे उत्पादन देते.
झारसीम जातीची देशी कोंबडी तिच्या जन्मानंतर 180 दिवसांमध्ये अंडी द्यायला सुरुवात करते. वर्षाला सरासरी 165 ते 170 अंडी देते व मांस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून देखील ही कोंबडीची जात फायद्याचे ठरते. कारण सामान्य देशी कोंबडीच्या तुलनेमध्ये या कोंबडीचे वजन जवळपास दुप्पट असते.
कारण या कोंबडीच्या अंड्यांचा आकार देखील इतर सामान्य देशी कोंबडीच्या अंड्याच्या आकाराच्या तुलनेत मोठा असतो व त्यांचे वजन देखील जास्त असते. त्यामुळे या जातीच्या कोंबड्यांच्या अंड्यांना देखील मागणी जास्त असते. जर आपण या जातीच्या कोंबड्यांचे एका अंड्याचे वजन बघितले तर ते 50 ते 55 ग्रॅम पर्यंत असते व इतर कोंबड्यांचे अंड्याचे वजन 30 ग्रॅम असते.
तसेच वाढीच्या बाबतीत बघितले तर या कोंबडीचे वजन तीन महिन्यात दीड किलोपर्यंत वाढते. तसेच या कोंबडीची शारीरिक रचना अतिशय आकर्षक असून ते दिसायला देखील खूप आकर्षक व बहुरंगी असते.
तसेच झारसीम जातीच्या देशी कोंबडीचा जीवनकाळ जास्त दिवसांचा असतो. तसेच या जातीच्या कोंबड्यांच्या अंड्यांमध्ये प्रथिने जास्त असतात व त्यामुळे या कोंबडीच्या अंड्यांना मागणी जास्त असते.तसेच कोंबडीचे मांस उत्पादन देखील जास्त मिळते.