आर्थिक

एफडीपेक्षा जास्त व्याज मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक! मिळतो एफडीपेक्षा जास्त व्याजदर

Published by
Ajay Patil

Post Office Saving Scheme:- मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीचा खूप सुरक्षित आणि विश्वासार्ह असा पर्याय समजला जातो. बँकांच्या माध्यमातून अनेक फिक्स डिपॉझिट  योजना राबवल्या जातात व या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुदत ठेव म्हणजे एफडी केली जाते.

यामध्ये गुंतवणूक सुरक्षित राहतेस परंतु मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो. त्यामुळे विविध बँकांमध्ये एफडी करण्याला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांकडून पसंती दिली जाते.

परंतु तुम्हाला जर एफडीपेक्षा जास्त व्याज मिळवायचे असेल तर त्याकरिता पोस्ट ऑफिसच्या बचत योजना देखील फायद्याच्या ठरतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना असून यातील काही योजनांमध्ये गुंतवणूकदारांना तब्बल 8.2% पर्यंत व्याजदर मिळतो. इतकेच नाहीतर पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये करात देखील सूट मिळते. या अनुषंगाने या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या या लोकप्रिय योजनांची माहिती थोडक्यात बघू.

 पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये एफडीपेक्षा मिळेल जास्त व्याज

1- ज्येष्ठ नागरिक बचत योजना ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक महत्त्वाची योजना असून भारतात राहणारे ज्येष्ठ नागरिक या योजनेत खाते उघडू शकतात व या योजनेत एकरकमी रक्कम गुंतवू शकतात.

पोस्टाच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट म्हणजे संयुक्त खाते देखील उघडता येते. या योजनेत करात सूट देखील मिळते व गुंतवणुकीवर 8.2% दराने व्याज मिळते.

2- किसान विकास पत्र योजना भारत सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले हे एक प्रमाणपत्र असून या योजनेत केलेल्या गुंतवणुकीतून निश्चित व्याजदर आणि हमी परतावा मिळतो.

परंतु या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आयकर सवलत मात्र मिळत नाही. या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर 7.5% वार्षिक चक्रवाढ व्याजदर मिळतो.

3- एमआयएस अर्थात पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्न मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देते. एखादी व्यक्ती पंधराशे रुपये आणि जास्तीत जास्त नऊ लाख रुपये या योजनेत गुंतवू शकते.

या योजनेमध्ये जर संयुक्त खाते घडले असेल तर गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत आहे. या योजनेत देखील कर सवलत मिळत नाही व गुंतवणुकीवर 7.4 टक्के प्रति वर्ष दराने व्याज मिळते.

4- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी योजना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात नॅशनल सेविंग सर्टिफिकेट योजना देखील एक महत्त्वाची योजना असून या योजनेमध्ये कोणतीही व्यक्ती एक खाते उघडू शकते तर तीन व्यक्ती मिळून संयुक्त खाते देखील उघडता येते. तसेच पालक अल्पवयीन किंवा आजारी व्यक्तींसाठी या योजनेत खाते चालवू शकतात. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर 7.7% वार्षिक चक्रवाढ व्याजदर मिळतो.

5- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र केंद्र सरकारने सुरू केलेला हा एक उपक्रम असून महिलांमध्ये बचतीची संस्कृती आणि सवय वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. या योजनेत देखील केलेल्या गुंतवणुकीवर कर सूट मिळत नाही. गुंतवणुकीवर 7.5% वार्षिक व्याजदर मिळतो.

Ajay Patil