Categories: आर्थिक

मोबाइल निर्मितीत भारत करणार ‘असे’ काही; चीनच्या बाबतीत …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत चीनला मागे टाकण्याचा भारताचा निर्धार असल्याचे दूरसंचार तसेच आयटी खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी फिक्की संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगितले.

मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत 2017 साली भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला होता. आता आमचे लक्ष्य पहिल्या क्रमांकाचे असल्याचे प्रसाद यांनी नमूद केले. उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीआयएल) योजनेनुसार भारताने जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासोबतच मोबाइल निर्मितीत चीनला मागे टाकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे,

असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआई) योजना सुरु केली होती.

जागतिक क्षेत्रातील कंपन्यानी भारतात यावे, हा योजनेचा उद्देश होता, असे सांगून प्रसाद पुढे म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स बाबतच्या राष्ट्रीय धोरणात (एनपीई) 2019 ते 2025 या काळात या क्षेत्राची उलाढाल 26 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यातील 13 लाख कोटी रुपयांचा मोबाईल उत्पादनाचा असेल. पीएलआय योजनेचे उद्दिष्ट केवळ जागतिक कंपन्यांना भारतात आणणे इतकेच नाही तर भारतीय कंपन्याना जागतिक स्तराचे बनविणे, हेही आहे. पीएलआई योजनेअंतर्गत पात्र कंपन्याना 48 हजार कोटी रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन मिळू शकते.

पीआयएल योजनेअंतर्गत सरकारने स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या एकूण ११ हजार कोटी रुपयांच्या १६ करारांना मंजुरी दिली आहे. या कराराच्या माध्यमातून येत्या ५ वर्षात देशात १०.५ लाख कोटी रुपये मोबाइल निर्मिती क्षेत्रात गुंतवले जातील.

अहमदनगर लाईव्ह 24