APY Pension Scheme:- आयुष्यामध्ये जेव्हा व्यक्तीची वाटचाल वृद्धत्वाकडे म्हणजेच उतारवयाकडे सुरू होते. तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये व्यक्तीला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.
परंतु अशा आयुष्याच्या उतारवयामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये आपल्याला कुणावर अवलंबून राहायची गरज भासू नये किंवा पैशांच्या दृष्टिकोनातून कुणाकडे हात पसरवायची वेळ येऊ नये तर याकरिता आत्तापासूनच आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे असते.
त्यामुळे बरेचजण आतापासूनच चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करतात व भविष्यकाळ आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. या सगळ्या मुद्द्याला धरून जर बघितले तर याकरिता पेन्शन योजनांचा लाभ घेणे खूप गरजेचे ठरते.
चांगल्या गुंतवणूक किंवा चांगल्या पेन्शन योजनांमध्ये पैसे गुंतवून येणाऱ्या भविष्यकाळात पेन्शनची हमी मिळवून म्हातारपण मजेत जाईल अशा दृष्टिकोनातून तयारी करून ठेवणे ही आता काळाची गरज आहे.
त्यामुळे सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणारी व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असलेली एक योजना जर बघितली तर ती पेन्शन मिळण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणूक करून खात्रीशीर पेन्शन मिळू शकतात.
काय आहे अटल पेन्शन योजनेचे स्वरूप?
अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक योजना असून या योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील मजुरांना त्यांचे वय 60 वर्षे झाल्यानंतर स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरते. एकदा का या योजनेचे सदस्यत्व घेतले तर संबंधित व्यक्तीला लगेच कायम निवृत्ती खाते क्रमांक मिळतो.
उतारवयामध्ये पेन्शन हा व्यक्तीचा सर्वात मोठा आधार असतो व त्या दृष्टिकोनातून अटल पेन्शन योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक महिन्याला तुम्ही थोडी थोडी रक्कम जमा करून म्हातारपणात एक हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळू शकतात. या योजनेमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर वय हे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
कसे आहे या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या पेन्शनचे स्वरूप?
यामध्ये एखादा व्यक्ती किती पैशांचे योगदान किंवा किती पैसे या योजनेत गुंतवत आहेत त्यानुसार वयाच्या साठाव्या वर्षी पेन्शन मिळायला सुरुवात होते. यामध्ये साठाव्या वर्षी एक हजार रुपये, दोन हजार रुपये, 3000, चार आणि पाच हजार अशा स्वरूपामध्ये पेन्शन दिली जाते.
या योजनेचे संपूर्ण व्यवस्थापन हे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्याकडे आहे. जेव्हा व्यक्ती वयाचे साठ वर्षे पूर्ण करतो त्यानंतर त्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला एक हजारापासून ते पाच हजार रुपयेपर्यंत मासिक पेन्शन मिळते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणाला नोंदणी करता येते?
कुठल्याही भारतीय नागरिकाला या योजनेमध्ये सहभागी होता येते. वयाची 18 ते 40 वर्ष पूर्ण केलेल्या कुठलाही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये किमान वीस वर्षांसाठी योगदान देणे गरजेचे आहे व त्यानंतर वयाचे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पेन्शन मिळते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीकडे बचत खाते किंवा पोस्ट ऑफिस बचत खाते असणे गरजेचे आहे. तसेच या योजनेच्या बाबतीत तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळावे याकरिता बँकेला आधार किंवा मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे या योजनेचा फायदा असा होतो की जर ग्राहकाचा मृत्यू झाला तर संबंधित व्यक्तीचा पती किंवा पत्नीला पेन्शन मिळते व दोघेजण मरण पावले तर ग्राहकांची पेन्शन संपत्ती ही संबंधित व्यक्तीच्या वारसाला परत केली जाते.
अटल पेन्शन योजनेसाठी कसा करता येईल अर्ज?
जर अटल पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ज्या बँकेत व्यक्तीचे बचत खाते आहे त्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीचे बँकेत खाते असेल आणि ऑनलाईन इंटरनेट बँकिंग सुविधेचा तो लाभ घेत असेल
तर संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून या योजनेचा एक फॉर्म डाऊनलोड करून तो फॉर्म भरून बँकेत प्रत्यक्षपणे जाऊन सबमिट करावा लागतो. कारण या योजनेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सबमिट करता येत नाही.